लोकसत्ता वार्ताहर
धुळे: नेतृत्व विकास मिशन अंतर्गत शिरपूर आणि साक्री विधानसभा मतदारसंघातील गटनिहाय बैठकांचे आयोजन करून स्थानिक केंद्र (बूथ) पातळीपर्यंत पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी कार्यकर्त्यांनी आवश्यक प्रयत्न करावेत. असे आवाहन प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष आ.कुणाल पाटील यांनी नेतृत्व विकास मिशन आयोजित धुळे जिल्ह्यातील बैठकीत केले.
रविवारी सकाळी कस्तुरबा सभागृहात नेतृत्व विकास मिशन अंतर्गत नंदुरबार लोकसभा मतदारसंघातील साक्री आणि शिरपूर विधानसभा मतदार संघाच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बैठक झाली. यावेळी धुळे जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष श्यामकांत सनेर, माजी खासदार बापूसाहेब चौरे, नंदुरबार नेतृत्व विकास मिशनचे समन्वयक संदेश जैन हे उपस्थित होते.
नंदुरबार लोकसभा मतदारसंघातील नेतृत्व विकास मिशनचे समन्वयक संदेश जैन आणि साक्री विधानसभा मतदारसंघाचे समन्वयक मनीष साहू यांनी बैठकीमागील भूमिका विशद केली. देशातील आदिवासी जाती व जमातीच्या लोकसभा मतदारसंघातील विधानसभा क्षेत्रात पक्षाचे संघटन मजबूत व्हावे, यादृष्टीने नेतृत्व विकास मिशन देशभर काम करीत आहे. या पार्श्वभूमीवर धुळे जिल्ह्यातील बैठक झाली. बैठकीत साक्री व शिरपूर विधानसभा क्षेत्रात प्राधान्याने बैठकीचे आयोजन करणे, त्यानंतर गटनिहाय बैठकींचे आयोजन करून केंद्र पातळीवर संघटना मजबूत करण्यासारखे कार्यक्रम हाती घेण्याविषयी निर्णय झाला.आगामी काळात राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांच्या महाराष्ट्रात सहा जाहीर सभा होणार आहेत. याची माहिती देण्यात आली. या सभांचे आयोजन कुठे करावे, याबाबत कार्यकर्त्यांचे मत जाणून घेण्यात येणार आहे.
नेतृत्व विकास मिशनचे नवापूरचे समन्वयक वाजित सय्यद, शिरपूर तालुका काँग्रेसचे अध्यक्ष मनोहर पाटील, शिरपूर शहर काँग्रेसचे अध्यक्ष उत्तमराव महाजन, साक्री तालुका काँग्रेसचे अध्यक्ष भानुदास गांगुर्डे, पंचायत समितीचे सभापती शांताराम कुवर, जिल्हा परिषदेचे सदस्य विश्वासराव बागुल, किसान काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शामकांत भामरे, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष गणेश गर्दे आदी पदाधिकारी या बैठकीस उपस्थित होते.