नाशिक – सरकारने अपघाताबाबत बनवलेला कायदा अन्यायकारक असल्याने संतप्त झालेल्या नाशिक जिल्ह्यातील इंधन कंपन्यांच्या वाहतूकदार संघटनांनी पुकारलेल्या संपामुळे उत्तर महाराष्ट्र व मराठवाड्यातील १२ जिल्ह्यांतील इंधन पुरवठा सोमवारी सकाळपासून ठप्प झाला. इंधन व गॅस प्रकल्पातील सुमारे १४०० टँकरचालक संपात उतरले आहेत. यावर तोडगा न निघाल्यास अनेक भागांत इंधन व घरगुती गॅस सिलिंडरच्या तुटवड्याला तोंड द्यावे लागण्याची चिन्हे आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नाशिकच्या मनमाडलगतच्या पानेवाडी येथे इंडियन ऑइल, भारत पेट्रोलियम, एचपीसीएल, आयओसी या चार प्रमुख इंधन कंपन्यांचे प्रकल्प आहेत. आयओसीचा गॅस प्रकल्प आहे. या प्रकल्पातून नाशिक, उत्तर महाराष्ट्रातील जळगाव, धुळे, नंदुरबार आणि मराठवाड्यातील आठ ते नऊ जिल्ह्यांत इंधन व घरगुती गॅसचे वितरण केले जाते. सरकारने अपघाताबाबत केलेल्या कायद्यामध्ये १० वर्षांची शिक्षा आणि सात लाख दंडाची तरतूद आहे. आम्ही अपघात जाणीवपूर्वक करत नाही. असे कायदे अन्यायकारक असल्याची तक्रार चालकांनी केली. जाचक कायदे व अटी लादल्याच्या विरोधात सोमवारी सकाळपासून सर्वच टँकर चालक संपात उतरले. सकाळपासून त्यांनी एकही टँकर भरला नाही. त्यामुळे नाशिक, उत्तर महाराष्ट्रातील जळगाव, धुळे व नंदुरबार आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांतील दैनंदिन इंधन पुरवठा झाला नाही. या ठिकाणी चार कंपन्यांच्या प्रकल्पातून दैनंदिन सुमारे १२०० टँकर इंधन वितरणाचे काम करतात. तर ३०० ते ४०० घरगुती गॅसची वाहतूक करणारे टँकर आहेत. हे सर्व चालक संपात सहभागी होणार असल्याचे संघटनेकडून सांगण्यात आले.

हेही वाचा – व्यसनरुपी भस्मासूर दहनाने मालेगावात सरत्या वर्षाला निरोप

या आंदोलनामुळे इंधन व घरगुती गॅसचे वितरण खंडित झाले आहे. अपघाताबाबतचा निर्णय चुकीचा असून माल वाहतूक करणाऱ्या चालकांवर अन्याय करणारा आहे. सरकारच्या निर्णयाचा निषेध करीत टँकर चालकांनी बेमुदत संपात सहभागी होण्याचा निर्णय घेतल्याचे संघटनेकडून सांगण्यात आले. इंडियन ऑइल कंपनीसमोर टँकर चालकांनी एकत्रित येत धरणे आंदोलन सुरू केले. सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली.

सहा महिन्यांपूर्वी ग्रामस्थ-टँकर चालकांत वाद

नांदगाव रस्त्यावर नागापूर ते पानेवाडी दरम्यान दुतर्फा इंडियन ऑईल, भारत पेट्रोलियम आणि एचपीसीएल कंपन्यांच्या प्रकल्पातून इंधन वाहतूक करणारे टँकर उभे केले जातात. यामुळे परिसरात अपघातांचे प्रमाण वाढल्याने संतप्त ग्रामस्थांनी गेल्या जून महिन्यात टँकरच्या काचा फोडत चालकाला मारहाण केल्याची घटना घडली होती. तेव्हा इंधन प्रकल्पातील टँकर चालकांनी संप पुकारल्याने नाशिकसह अनेक जिल्ह्यांतील इंधन पुरवठा विस्कळीत झाला होता.

हेही वाचा – नाशिक जिल्ह्यातील वायनरींमध्ये पर्यटनाचा बहर, वाइनचा खप २० टक्क्यांनी वाढला

इंधन वाहतूक करणारे टँकर प्रकल्पाबाहेर रस्त्यावर उभे केले जातात. आपला क्रमांक आल्यावर टँकर आत जातात. वेगाने जाणाऱ्या टँकरने परिसरात अनेक अपघात झाले आहेत. इंधन वाहतूक करणारी वाहने महामार्गावर उभी केली जाऊ नयेत, यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात करावा. रस्त्यावर ते अवैधपणे उभे केल्याने अपघात झाल्यास कंपन्यांच्या अधिकाऱ्ऱ्यांवर गुन्हे दाखल करावेत, असे पत्र नागापूर ग्रामपंचायतीने मनमाड पोलिसांना दिले आहे. याच मुद्यावरून नागापूर ग्रामस्थ आणि टँकर चालक-मालक यांच्यात बराच वाद झाला होता.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Strike of fuel gas transporters in nashik district ssb
Show comments