लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

नाशिक : आगामी वर्षात महानगरपालिकेच्या दोन प्रमुख रुग्णालयांमध्ये डोळ्यांवरील शस्त्रक्रियेची व्यवस्था, तळघर व धोकादायक ठिकाणांवरील आग विझविण्यासाठी यंत्रमानव, सिटीलिंकच्या ताफ्यात ५० नवीन इलेक्ट्रिक बस, शहरातील रस्त्यांचे सुरक्षा दृष्टीकोनातून तर सर्व पुलांचे संररचनात्मक परीक्षण करण्याची तयारी आदींचे नियोजन अंदाजपत्रकात करण्यात आले आहे. वाहतूक कोंडींवर अभियांत्रिकी महाविद्यालये व स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने गणना करून उपाय शोधण्यात येणार आहे.

आगामी काळात सिंहस्थ कुंभमेळा, आरोग्य वैद्यकीय सुविधा, स्वच्छता व घनकचरा व्यवस्थापन, नदी स्वच्छता आदींवरील खर्चाचा प्रामुख्याने महानगरपालिका अंदाजपत्रकात विचार करण्यात आला आहे. शहरातील नदी, नाले यावर बांधलेले पूल, स्वातंत्र्यवीर सावरकर उड्डाणपूल यांचे संररचनात्मक परीक्षण करण्यात येणार आहे. त्यांना सुस्थितीत ठेवण्याकरिता उपाययोजनेसाठी शासनाकडून निधी मिळवण्याचा प्रयत्न आहे. शहरातील रस्त्यांचे स्वयंसेवी संस्था व महाविद्यालयांच्या मदतीने सुरक्षा पडताळणी परीक्षण करण्यात येणार आहे.

टिकरिंग प्रयोगशाळेच्या माध्यमातून विज्ञान केंद्र उभारण्यात येणार आहे. आगामी वर्षात ४१ आरोग्यवर्धिनी केंद्र आणि नऊ हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे-आपला दवाखाना सुरू करण्याचे नियोजन आहे. नाशिकरोड येथील हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे रुग्णालय आणि डॉ. झाकीर हुसेन रुग्णालय या ठिकाणी डोळ्यांच्या शस्त्रक्रियेसाठी अद्ययावत यंत्रणा आणि शस्त्रक्रियागृह तयार करण्यात येणार आहे. सध्या नाशिक पूर्व विभागात विद्युत दाहिनीद्वारे अंत्यसंस्कार केले जातात. आगामी वर्षात दसक, नाशिकरोड, पंचवटी, उंटवाडी आणि नवीन नाशिक येथे दहनविधीसाठी विद्युत दाहिनी उभारण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे.

आग विझवण्यासाठी यंत्रमानव

तळघरातील आग विझविण्यासह ज्या धोकादायक ठिकाणी अग्निशमन दलाचे जवान आग विझवू शकत नाहीत, अशा ठिकाणी दूरनियंत्रकाधारीत यंत्रमानवांची खरेदी करण्यात येणार आहे. यासाठी सुमारे पावणेसात कोटींचा खर्च गृहीत धरण्यात आला आहे. या शिवाय शहरात ७० मीटरपेक्षा उंच इमारतींना बांधकाम परवानगी दिली जात असल्याने आग नियंत्रण व आपत्कालीन स्थितीवर मात करण्यासाठी ९० मीटर उंचीच्या शिडीचा समावेश असणारी विदेशी बनावटीचे एरिअल लँडर वाहन खऱेदीचे आदेश दिले गेले आहेत. त्यासाठी ३८.२७ कोटींचा खर्च होणार असून ही यंत्रणा पुढील वर्षात फेब्रुवारीत अग्निशमन दलात समाविष्ट होईल.

सिटीलिंक ताफ्यात ५० इलेक्टिक बस

मनपाच्या सिटीलिंक या शहर बससेवेसाठी आगामी वर्षात ५० इलेक्ट्रिक बस जीसीसी तत्वावर घेण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे. तसेच इलेक्ट्रिक बससाठी आडगाव ट्रक टर्मिनस येथे स्वतंत्र बस आगाराचे कामकाज प्रगतीपथावर आहे. नवीन वर्षात या बस सेवेत दाखल होतील. परिवहन सेवेसाठी ८०.१३ कोटींची तरतूद करण्यात आली आहे.

सिंहस्थासाठी दोन पुलांची उभारणी

लक्ष्मीनारायण मंदिरालगत समांतर पूल आणि रामवाडी ते घारपुरे घाटपर्यंत एक अशा दोन पुलांची कामे सिंहस्थाच्या दृष्टीकोनातून प्रस्तावित करण्यात आली आहेत. शहरातील बाह्य, मध्य आणि अंतर्गत रिंग रस्ते आणि इतर सर्व महत्वाचे रस्ते पूर्णपणे विकसित करण्याच्या दृष्टीकोनातून मिसिंग लिंक शोधून अशा जागा टीडीआर, एफएसआच्या माध्यमातून ताब्यात घेण्यासाठी प्रयत्न केला जाणार आहे.

Story img Loader