प्रकल्प हाताळण्यासह प्रात्यक्षिकाची संधी 

प्राजक्ता नागपुरे, नाशिक

प्रत्येकाच्या हातात असलेल्या ‘स्मार्ट’ भ्रमणध्वनीमध्ये नेमकं काय दडलंय, ब्लू टूथद्वारे भ्रमणध्वनीचा वापर कसा करता येईल, वयमापनाची अत्याधुनिक पद्धत असे विविध प्रकल्प येथील हं. प्रा. ठा. कला आणि रा. य. क्ष. विज्ञान महाविद्यालय तसेच संडे सायन्स फोरमच्या वतीने आयोजित वैज्ञानिक प्रदर्शनात मांडण्यात आले आहेत. प्रदर्शनाचे वैशिष्टय़े म्हणजे विद्यार्थ्यांना यातील प्रकल्प हाताळता येत असून प्रात्यक्षिकदेखील करता येत आहे.

महाविद्यालयाच्या भौतिकशास्त्र, जीवशास्त्र, रसायनशास्त्र, सूक्ष्मजीवशास्त्र, सांख्यिकी, गणित या विभागांसह संडे सायन्स स्कूल फोरमने एकत्रित येत विज्ञान प्रदर्शन भरविले आहे.  प्रदर्शनात विद्यार्थ्यांच्या मनातील वैज्ञानिक जिज्ञासा वाढीस लागावी, त्यांच्या मनात विज्ञानविषयक कुतूहल निर्माण व्हावे, शाळेत शिकवल्या जाणाऱ्या वेगवेगळ्या संकल्पना स्पष्ट व्हाव्या या उद्देशाने २५ प्रकल्पांची मांडणी करण्यात आली आहे. कुठल्याही तंत्र-मंत्रच्या मालिकेत कोणाच्याही हालचालींशिवाय खुर्ची कशी हलते याचे प्रात्यक्षिक या ठिकाणी दाखविण्यात येत आहे. दिवसातील जास्तीतजास्त वेळ हातात असलेला स्मार्ट भ्रमणध्वनी किंवा कामासाठी सतत समोर असलेला संगणक याचे काम नेमके कसे चालते, काही आज्ञावलींच्या मदतीने पडद्यावर आपल्याला अपेक्षित कसे येते, जंगलात किंवा अनोळखी ठिकाणी हरवल्यावर दिशादर्शक कशा पद्धतीने काम करते, अशा विविध प्रश्नाची उत्तरे या ठिकाणी प्रकल्पांमध्ये सापडत आहे.

प्राणीशास्त्राच्या अवनी शुक्ला हिने शालेय विज्ञान विषयात पहिल्यापासून आढळणारा अमिबा नेमका कसा असतो, हे अतिसूक्ष्म जीव मायक्रोस्कोपच्या माध्यमातून मांडले आहे. याशिवाय मानवी डीएनए ही संकल्पना कागदी प्रतिकृतीच्या माध्यमातून स्पष्ट करण्यात आली आहे.  याशिवाय युनिसेफच्या ‘हात स्वच्छ धुवा’ या मोहिमेविषयी प्रबोधन करण्यासाठी सूक्ष्मजीवशास्त्राच्या विद्यार्थ्यांंनी दिवसभर हातावर असणारे जीवाणू अनेक प्रकारच्या आजाराला कशा प्रकारे निमंत्रण देतात याचे प्रात्यक्षिक टेस्ट टय़ुब, क्रिस्टल सँड यांचा वापर करून दाखविले. दरम्यान,  प्रदर्शनाचे उद्घाटन सावित्री बाई फुले, पुणे विद्यापीठाचे प्रा. दिलीप कान्हेरे यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमास प्राचार्य व्ही. एन. सूर्यवंशी, सायन्स फोरमचे अनिल क्षत्रिय, प्रदर्शनाचे संयोजक प्रा. डॉ. पी. पी. जोशी आदी उपस्थित होते.

प्रदर्शनातील लक्षवेधी प्रकल्प

*   सांख्यिकीच्या सहाय्याने सामन्यांचे निकाल काढणे

*   सोप्यापद्धतीने रोजच्या जमाखर्चाचा हिशेब करण्यासाठी पायचाट

*   ट्रान्सफॉर्मरमध्ये चुंबकीयविद्युत शक्तीचा वापर करत तयार करण्यात आलेले प्रकल्प

*   फिरणारी खुर्ची

 

 

Story img Loader