नेहमीच्या ठिकाणी प्रेमवीर फिरकलेच नाहीत

नाशिक : ‘प्रेम कर भिल्लासारखं, बाणावरती खोचलेलं..’, ‘तिने प्रेम केलं, त्याने प्रेम केलं, मला सांगा तुमचं काय गेलं?..’ , ‘प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आमचं सेम असतं..’ प्रसिद्ध साहित्यिकांनी अशा प्रकारे आपल्या काव्यातून प्रेमाची महती व्यक्त केली आहे. मात्र गुरुवारी शहरातील महाविद्यालयीन परिसरात पोलिसांच्या धाकाने ‘व्हॅलेंटाइन डे’ अर्थात प्रेमदिन जाहीरपणे साजरा करता आला नाही. त्यामुळे प्रेमदिनाचा रंग या परिसरात काहीसा फिकाच राहिला.

काही वर्षांपासून पाश्चिमात्य संस्कृतीचे अनुकरण करीत महाविद्यालयीन विद्यार्थ्यांकडून प्रेमदिन उत्साहात साजरा करण्यात येतो. या दिनानिमित्त विविध भेटवस्तूंच्या स्वरूपात लाखोंची उलाढाल होत असल्याने शहरातील बाजारपेठही त्यासाठी सजली. वेगवेगळ्या भेटवस्तूंचे पर्याय प्रेमवीरांना खुले करून देण्यात आले. खाद्यगृहांनीही बदामाच्या आकाराचे फुगे आणि रोषणाई करीत दुकाने सजविली. चॉकलेट, केक, चॉकलेट बुके युवा वर्गासाठी तयार ठेवले. भेटवस्तूंच्या दुकानात काही तरी हटके म्हणून घडय़ाळ, कॉफीमग यांचाही पर्याय ठेवण्यात आला. दुसरीकडे, काही महिन्यांपासून शहरातील कायदा आणि सुव्यवस्था पार बिघडल्याने या दिवशी काही अनुचित प्रकार घडू नये म्हणून दक्षता घेत पोलिसांनी प्रेमवीरांची ठिकाणे म्हणून परिचित असलेल्या कॉलेज रोड, पांडवलेणी परिसर, आसारामबापू पूल, सोमेश्वर धबधबा आदी ठिकाणी बंदोबस्त ठेवल्याने प्रेमवीर फारसे फिरकलेच नाहीत.

शहरातील शिकवणी वर्गाच्या बाहेर अल्पवयीन विद्यार्थ्यांचे घोळके काही ठिकाणी लाल गुलाब, चॉकलेट हातात घेऊन उभे होते. पोलिसांचे वाहन दिसताच अनेकांनी धूम ठोकली. शहर परिसरापासून मोटरसायकलवरून किंवा चारचाकीमधून दूर जात काही प्रेमवीरांनी प्रेमदिन साजरा केला. विवाहितांनीही महाविद्यालयीन दिवसांच्या आठवणी जागवीत प्रेमदिन उत्साहाने साजरा केला. बहुतांश प्रेमवीरांनी चित्रपटगृहात आवडता चित्रपट पाहण्याला पसंती दिली. दुसरीकडे, नवमाध्यमांत ‘प्रेमदिनाची’ धूम अनेकांनी अनुभवली. कवी कुसुमाग्रज, मंगेश पाडगांवकर यांच्यासह नवोदित कवींच्या कविता, चंद्रशेखर गोखलेंच्या चारोळ्यांचा आधार घेत काहींनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

Story img Loader