नाशिक – मागील आठवड्यात भाजप आमदार देवयानी फरांदे यांनी पोलिसांसह कॅफेमध्ये छापा टाकून काही युवक-युवती गैरकृत्य करत असल्याचा आरोप केला होता. त्यानंतर परवानगीशिवाय संबंधितांचे छायाचित्र व चित्रफिती प्रसारित केल्या. यामुळे संविधानाने दिलेल्या मूलभूत अधिकारांचे उल्लंघन झाले असून, संबंधित आमदारावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी ऑल इंडिया स्टुडंट्स फेडरेशनच्या (एआयएसएफ) नाशिक शाखेने पोलीस आयुक्तांकडे केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

एआयएसएफच्या राज्य सहसचिव प्राजक्ता कापडणे, शहर सचिव अंकित यादव, सदस्या तल्हा शेख, कैवल्य चंद्रात्रे आदींनी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांची भेट घेऊन निवेदन दिले. गंगापूर रस्त्यावरील एका कॅफेत घडलेल्या घटनेमुळे युवकांमध्ये नाराजी आणि भीतीचे वातावरण आहे. युवक-युवती कॅफेमध्ये एकमेकांच्या सहमतीने बसले होते. तरीही त्यांच्यावर अनावश्यक कारवाई करण्यात आली, त्यांचा व्यक्तिगत हक्क आणि गोपनीयतेचा भंग झाला. भारतीय संविधानाने प्रत्येकाला खासगी आयुष्य जगण्याचा अधिकार दिला आहे. जर दोन व्यक्ती परस्पर सहमतीने कोणत्याही ठिकाणी वेळ घालवत असतील, तर त्यावर हस्तक्षेप करणे चुकीचे आहे, अशी भूमिका संघटनेने मांडली आहे. यावेळी राहुल भुजबळ, हर्षाली अढांगळे, नंदिनी वाघमारे यांसह इतरही कार्यकर्ते उपस्थित होते.

आमदारांनी गुन्हेगारीविरुध्द आवाज उठवावा

लोकप्रतिनिधी म्हणून आमदारांनी शिक्षण, रोजगार, आरोग्य, वाहतूक यांसारख्या गंभीर विषयांवर लक्ष केंद्रित करणे अपेक्षित आहे. शहरात अंमली पदार्थांचा व्यवसाय फोफावत आहे, दिवसाढवळ्या हत्या, बलात्कार होत असून गुन्हेगारी वाढत आहे. परंतु हे सगळे विषय सोडून आमदार प्रसिद्धी स्टंट करण्यात व्यस्त असल्याचा आरोप एआयएसएफच्या पदाधिकाऱ्यांनी केला.