तीन महिन्यांचे पास काढूनही नाशिक-इगतपुरी दरम्यान पुरेशी बससेवा उपलब्धता केली जात नसल्याने संतप्त शेकडो पासधारक विद्यार्थ्यांनी सोमवारी आक्रमक पवित्रा घेऊन जुन्या सीबीएस स्थानकातून बाहेर पडणाऱ्या बस रोखून धरल्याने यंत्रणेची तारांबळ उडाली. एक ते दीड तास चाललेल्या आंदोलनाने बससेवेचे वेळापत्रक विस्कळीत झाले. अखेर तातडीने दोन बसची उपलब्धता करण्यात आली. अडकलेल्या विद्यार्थ्यांना अक्षरश: कोंबून इगतपुरीकडे मार्गस्थ करण्यात आले. एसटीच्या अनेक मार्गांवर महानगरपालिकेच्या सिटीलिंक शहर बससेवा धावू लागली आहे. त्यामुळे एसटीकडून काही फेऱ्यांमध्ये फेरबदल केले जात असल्याचा फटका विद्यार्थ्यांना सहन करावा लागत असल्याचे चित्र आहे.
हेही वाचा >>> नाशिक: मिठाई दुकानात कामगाराकडूनच चोरी; उत्तर प्रदेशातून संशयितास अटक
ग्रामीण भागातून शहरात शिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या हजारोंच्या घरात आहे. एकट्या इगतपुरी तालुक्यातून ७०० ते ८०० विद्यार्थी येतात. सकाळी नाशिकमध्ये येणाऱ्या विद्यार्थ्यांना परतीच्या प्रवासासाठी मात्र पुरेशा प्रमाणात बसची उपलब्धता होत नाही. बरीच प्रतीक्षा करूनही बस मिळत नसल्याने अनेकांना महामार्गावर जाऊन खासगी वाहनाने इगतपुरी वळणरस्त्यावर उतरावे लागते. सोमवारी दुपारी शेकडो विद्यार्थी सीबीएस स्थानकात बसची प्रतीक्षा करीत होते. दीड, दोन तास उलटूनही इगतपुरीला जाणारी बस न लागल्याने संतापलेल्या विद्यार्थ्यांनी स्थानकाच्या प्रवेशद्वारावर ठिय्या देत इतरत्र जाणाऱ्या बस रोखून धरल्या. अकस्मात झालेल्या आंदोलनाने प्रवासी आणि यंत्रणेची धावपळ उडाली. इगतपुरीची बस सोडल्याशिवाय स्थानकातून अन्य बस बाहेर पडू दिल्या जाणार नसल्याचा पवित्रा विद्यार्थ्यांनी घेतला.
हेही वाचा >>> नाशिक: बेछूट आरोप करणे इतकेच विरोधकांचे काम – श्रीकांत शिंदे यांची टीका
आंदोलनाची माहिती मिळताच सरकारवाडा पोलीस ठाण्यातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी धाव घेतली. विद्यार्थ्यांशी चर्चा केली. एसटीच्या अधिकाऱ्यांना विद्यार्थ्यांची गैरसोय दूर करण्याची सूचना केली. विद्यार्थ्यांच्या आंदोलनामुळे स्थानकात गोंधळ उडाला. स्थानकात अडकून पडलेल्या अन्य बससेवेला पोलिसांनी मार्ग मोकळा करून दिला.
एसटीने नाशिकहून इगतपुरीला जाण्यासाठी दोन बसची व्यवस्था केली. स्थानकावरील प्रवाश्यांच्या तुलनेत त्या अपुऱ्या होत्या. त्यामुळे जेव्हा या बस स्थानकात आल्या, तेव्हा जागा मिळविण्यासाठी खिडक्या, आपत्कालीन मार्ग, चालकाचा दरवाजा असे सर्व मार्ग अवलंबले गेले. बसमध्ये इतके विद्यार्थी झाले, की त्यांना हालचाल करण्यासही जागा नव्हती. भरगच्च स्थितीत त्या इगतपुरीकडे सोडल्या गेल्या. दरम्यान, या समस्येला एसटी आणि सिटीलिंकचे एकसमान मार्ग कारणीभूत ठरल्याचे दिसत आहे. सिटीलिंकची सेवा सुरू झाल्यानंतर एसटी महामंडळ आपल्या फेऱ्यांमध्ये काही बदल करते. त्याची झळ पासधारक विद्यार्थ्यांना बसत आहे.
मालमोटारीने रात्री १० वाजता इगतपुरी
इगतपुरीकडे जाण्यासाठी बसच्या अनुपलब्धतेची समस्या महिनाभरापासून भेडसावत असल्याचे विद्यार्थ्यांनी म्हटले आहे. मुलांसह मुलींनाही अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. बहुतेकांनी १८०० रुपये भरून तीन महिन्यांचे पास काढले आहेत. मात्र दुपारनंतर घरी जाण्यासाठी बसची व्यवस्था नसते. अखेर महामार्गावर जाऊन मालमोटार वा खासगी वाहनांद्वारे पैसे देऊन इगतपुरी गाठावे लागते. घरी जाण्यास अनेकदा रात्रीचे १० वाजतात, असे निखील गवाणे, साहिल मुसळे, सुशांत धोंगडे, ऋषिकेश गवाणे यांनी सांगितले. नाशिक-इगतपुरी मार्गावरील विद्यार्थ्यांचा वेगळाच प्रश्न आहे. विल्होळी येथील यश भावनाथने ३०० रुपये भरून महिनाभराचा पास काढला. मात्र, सर्व बस उड्डाण पुलावरून जात असल्याने त्याला पासचा उपयोग करता येत नाही. टॅक्सीने अतिरिक्त पैसे खर्च करून प्रवास करावा लागत असल्याचे त्याने सांगितले. शेकडो मुलांसाठी एखादी बस आल्यावर मुले कुठुनही शिरून जागा मिळवतात. पण, मुली व वयोवृध्दांना तसेही करता येत नाही.
नाशिक-इगतपुरी मार्गावरील बस वाहतूक कोंडीमुळे अधुनमधून विलंबाने धावतात. त्यामुळे एखाद्या दिवशी अडचणी येतात. पासधारक विद्यार्थ्यांना पुरेशा बस उपलब्ध आहेत. बस वेळेवर धावण्यासाठी त्यांचे वेळापत्रक बदलून त्या आधी सोडल्या जातील. विद्यार्थ्यांची गैरसोय होणार नाही, याची काळजी घेतली जाईल. मंगळवारपासून एसटीचे अधिकारी दुपारी तीन वाजेपासून सीबीएस स्थानकात थांबून नियोजन करतील.
– अरुण सिया (विभाग नियंत्रक, राज्य परिवहन महामंडळ, नाशिक)