कला, वाणिज्य, विज्ञान, किमान कौशल्यसाठी जिल्ह्यात २४,५६० जागा
नाशिक : इयत्ता १० वीचा निकाल जाहीर होऊन आठवडा उलटला असला तरी अद्याप ११ वी प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर झालेले नाही. पालकांकडून विद्यार्थ्यांच्या निकालानुसार वेगवेगळय़ा पर्यायाची चाचपणी सुरू आहे. दुसरीकडे, उत्तीर्ण विद्यार्थ्यांची संख्या आणि उपलब्ध जागा यामध्ये तफावत असली तरी औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) किंवा पदविका अभ्यासक्रमास विद्यार्थी प्रवेश घेतील. यामुळे ही तफावत कमी होईल अशी शक्यता शिक्षण मंडळाकडून वर्तविण्यात येत आहे.
इयत्ता १० वीच्या निकालानंतर विद्यार्थ्यांना पुढील अभ्यासक्रमांसाठी प्रवेशाचे वेध लागतात, परंतु निकाल लागून १० दिवस होऊनही शिक्षण मंडळाकडून इयत्ता ११ वी प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक अद्याप जाहीर झालेले नाही. कला, वाणिज्य, विज्ञान, किमान कौशल्यसाठी जिल्ह्यात २४,५६० जागा उपलब्ध आहेत. यामध्ये कला शाखेसाठी ३३ महाविद्यालयांमध्ये ४७१०, वाणिज्य ६७ महाविद्यालयांमध्ये ८३७०, विज्ञान ७३ महाविद्यालयांत १०, ४०० आणि किमान कौशल्य १० महाविद्यालयांमध्ये एक हजार ८० जागा उपलब्ध आहेत. इयत्ता १० वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांची संख्या आणि उपलब्ध जागा यात तफावत असल्याने प्रवेशाचा तिढा निर्माण होण्याची शंका पालकांकडून व्यक्त करण्याात येत आहे, परंतु गेल्या काही वर्षांत १० वीनंतर अभियांत्रिकी, यांत्रिकीसह अन्य व्यावसायिक अभ्यासक्रमांकडे विद्यार्थ्यांचा कल राहिला आहे. यामुळे ११ वी प्रवेशाच्या वेळी जागा रिक्त राहतील, असा विश्वास शिक्षण मंडळाकडून व्यक्त होत आहे. दुसरीकडे, पालकांकडून विद्यार्थ्यांच्या बौध्दिक तसेच आपल्या आर्थिक क्षमतांचा विचार करता अन्य काही पर्यायांची चाचपणी सुरू आहे. शहर परिसरातील पदविका अभ्यासक्रम असलेल्या महाविद्यालयांमध्ये पालकांकडून विचारणा होत आहे. विज्ञान शाखेकडे कल असला तरी गुण कमी असल्यामुळे काहींनी खासगी शिकवणी वर्गाशी संधान असलेल्या महाविद्यालयांना पसंती दिली आहे. यामुळे पालकांवर अधिकचा आर्थिक भार पडत आहे.