नाशिक – शाळेत अद्ययावत प्रयोगशाळा, ग्रंथालय पाहिजे…खेळण्यासाठी मैदान नाही…शाळांच्या वेळेत बदल करावा…पोहणे शिकविण्यासाठी शासकीय प्रशिक्षक द्यावा, कुस्तीसाठी शाळेत आखाडा तयार करावा, असे एक ना अनेक मूलभूत प्रश्न आणि मागण्या करुन विद्यार्थ्यांनी राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांना भंडावून सोडले.
हेही वाचा >>> भुसावळ-दादर दरम्यान धावणाऱ्या विशेष रेल्वे गाड्यांना मुदतवाढ; पश्चिम रेल्वे प्रशासनाचा निर्णय
शालेय शिक्षण खात्याचा पदभार स्वीकारण्यासाठी दादा भुसे हे सोमवारी सकाळी जिल्ह्यातील ५० हून अधिक विद्यार्थ्यांना घेऊन मुंबईकडे मार्गस्थ झाले. तत्पुर्वी जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी विद्यार्थ्यांनी शाळेतील अनेक विषयांकडे लक्ष वेधले. भुसे यांच्याबरोबर मुंबईला जाण्यासाठी सकाळी साडेसात वाजता शासकीय कन्या विद्यालयात विद्यार्थ्यांना उपस्थित राहण्याच्या सूचना होत्या. त्यामुळे भल्या पहाटे उठून विद्यार्थ्यांसह शिक्षकांना धावपळ करत नाशिक गाठावे लागले. काही आश्रमशाळेतील मुले दोन दिवस आधीच शहरात आल्याचे पालकांनी सांगितले. काही विद्यार्थी पहाटे ८० ते ९० किलोमीटरचा प्रवास करून आले होते. प्रत्येकाबरोबर शिक्षक होते. विद्यार्थ्यांना कुठलाही त्रास झाला नाही, ते वेळेत पोहोचले, असे शिक्षकांनी म्हटले आहे.
हेही वाचा >>> जळगाव औद्योगिक वसाहतीत चटई कारखान्याला आग
गरीब विद्यार्थ्याला गुणवत्तापूर्ण, दर्जेदार, आनंददायी शिक्षण मिळाले पाहिजे. यासाठी शालेय शिक्षण विभाग जिवाचे रान करेल. आवश्यक तिथे सुधारणा केल्या जातील. विद्यार्थी, शिक्षक, पालक सर्वांचे मनोगत जाणून कृती आराखडा तयार केला जाईल. जादुची कांडी फिरेल आणि सर्व चित्र लगेच बदलेल, असा आपला दावा नाही. मात्र विद्यार्थी केंद्रबिंदू मानून चांगले काम करण्याचा प्रयत्न केला जाईल, असे शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी सांगितले.
गणवेशाविना स्काऊट गाईडचे विद्यार्थी स्काऊट गाईडच्या विद्यार्थ्यांच्या गणवेशाचे कापड तीन महिन्यांपासून पडून आहे. आता तालुका पातळीवर इ निविदा काढून तातडीने गणवेश शिवून घेण्याचे निर्देश देण्यात आले. प्रजासत्ताक दिन गणवेशात साजरा करावा, असे सूचित करण्यात आल्याचे भुसे यांनी नमूद केले.