नाशिक : शिक्षक आणि पालक यांच्यातील विसंवादाचा फटका विद्यार्थ्यांना बसला असून विद्यार्थ्यांवरच वर्ग घेण्याची वेळ आली आहे. इगतपुरी तालुक्यातील दरेवाडी जिल्हा परिषद शाळेत हा प्रकार घडला असून शाळा नियमितपणे दोन दिवसात सुरू न झाल्यास शिक्षणाधिकारी कार्यालयात शाळा भरविण्यात येईल, असा इशारा पालकांनी दिला आहे.इगतपुरी तालुक्यात दरेवाडी जिल्हा परिषद शाळा आहे. या शाळेत पहिली ते सातवीचे वर्ग भरतात.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

काही दिवसांपूर्वी पालकांनी केंद्र प्रमुखांना मारहाण केल्याने तेव्हापासून शाळेत शिक्षक येत नाहीत. यामुळे वर्ग भरत नाही. शाळेतील विद्यार्थीच वर्गात शिकवित आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. एकदा गटशिक्षणाधिकाऱ्यांनी आधी शाळा सुरू ठेवण्याचा आणि नंतर शाळा बंद करण्याचा आदेश दिला. या आदेशाने संभ्रमात भर पडली असून अद्याप शाळेत शिक्षक येत नाहीत.

हेही वाचा : जळगाव : पीएफआय संघटनेशी संबंधित संशयित जळगावातून ताब्यात

प्रकरण नेमके काय ?

जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडून दरेवाडी शाळा बंद करण्याचा आदेश ऑगस्टमध्ये प्राप्त झाला. या निर्णयाविरोधात पालकांनी आवाज उठवत शिक्षण अधिकारी कार्यालयात शाळा भरविण्याचा इशारा दिला होता. त्यामुळे शिक्षण विभागाने हा आदेश मागे घेतला. पालकांचा राग निवळताच पुन्हा एकदा समायोजन आदेशामुळे वाद उदभवला. शिक्षण विभागाच्या या दुटप्पीपणामुळे पालक संतप्त झाले. त्यांनी केंद्रप्रमुखांवर हात उगारल्याने तेव्हापासून शिक्षक येत नाहीत.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Students role teachers in darewadi warning parents set up schools education officers office nashik tmb 01