नाशिक – महानगरपालिकेच्या मराठी आणि उर्दू माध्यमाच्या १२ माध्यमिक शाळांमध्ये सुमारे तीन हजार विद्यार्थी शिक्षण घेतात. यातील मराठी माध्यमाच्या शाळेत एकूण २० तर, उर्दू माध्यमांच्या शाळेत आठ अशी एकूण २८ शिक्षकांची पदे रिक्त आहेत. शिक्षकांअभावी विद्यार्थ्यांचे नुकसान होत असून विद्यार्थी संख्या कमी झाल्यास शाळा बंद पडू शकतात. शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्या जिल्ह्यात रिक्त पदांवर मनपाच्या प्राथमिक शाळेतील शिक्षकांची सेवाज्येष्ठतेनुसार तात्पुरती नेमणूक करण्यात येणार आहे.
हेही वाचा >>> गांजा तस्करांच्या मोटारीचा पोलिसांकडून थरारक पाठलाग; संशयितास पोलीस कोठडी
मनपा शिक्षण विभागाच्या प्रस्तावास बुधवारी स्थायी समिती व सर्वसाधारण सभेत मान्यता देण्यात आली. महापालिकेच्या मराठी माध्यमाच्या १० तर ऊर्दू माध्यमाच्या दोन अशा एकूण १२ शाळा आहेत. यातील मराठी माध्यमाच्या दोन अनुदानित, सहा व दोन स्वयंसहायता निधीतून सुरू असणाऱ्या शाळा आहेत. या शाळांमध्ये इयत्ता सहावी ते दहावीपर्यंतच्या वर्गात २८८१ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या शाळेत ७९ मंजूर पदे असून कार्यरत ५१ शिक्षक आहेत. २८ पदे रिक्त आहेत. शिक्षकांअभावी विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना सर्व प्रकारची शैक्षणिक सुविधा पुरविण्याची जबाबदारी महापालिकेची आहे. स्वयंअर्थसहायता निधीतून सुरू केलेल्या दोन शाळांना संच मान्यता मिळत नसल्याचे शिक्षण विभागाने म्हटले आहे.
हेही वाचा >>> Video : पुणे-पाचोरा एसटी बसचा दणदणाट…स्टेअरिंगचा थरथराट…प्रवाशांचा थरकाप…
शैक्षणिक नुकसान टाळण्याचे कारण शिक्षकांअभावी शाळेतील विद्यार्थ्यांची संख्या कमी होऊन शाळा बंद पडू शकतात. पवित्र पोर्टल प्रणालीच्या माध्यमातून तत्परतेने शिक्षकांची नेमणूक शक्य नसल्याने विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हिताच्या दृष्टीकोनातून माध्यमिक शाळेतील रिक्त पदांवर मनपा प्राथमिक शाळेतील बीएस्सी. बीएड आणि बीए. बीएड. शिक्षकांची सेवाज्येष्ठतेनुसार नेमणूक करण्याचा प्रस्ताव शिक्षण विभागाने सादर केला होता. प्राथमिक शाळेतील शिक्षकांच्या तात्पुरत्या नेमणुकीसाठी शिक्षकांच्या वेतन खर्चाला सर्वसाधारण सभेत मान्यता देण्यात आली.