नाशिक शहर पोलीस दलातील उपनिरीक्षक दत्तात्रय कडनोर यांना विशेष सेवेबद्दल राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर झाले आहे. कडनोर सध्या मध्यवर्ती गुन्हे शाखेत कार्यरत आहेत. प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर या पदकांची घोषणा करण्यात आली.
कडनोर हे पोलीस खात्यात हवालदार म्हणून एक जून १९९१ रोजी भरती झाले. सेवाकाळात देवळाली कॅम्प, नाशिकरोड, सरकारवाडा, भद्रकाली, विशेष शाखा, मुंबई नाका पोलीस ठाणे आणि मध्यवर्ती गुन्हे शाखा येथे नोकरी करीत असताना त्यांनी खून, चोरी, घरफोडी व दरोडा यासारख्या गंभीर गुन्ह्यांची उकल करण्यासाठी मदत केली. नाशिकरोड पोलीस ठाणे येथे कार्यरत असताना १५ गावठी बंदुका तसेच भद्रकाली पोलीस ठाणे येथे असताना ६५ दुचाकी हस्तगत केल्या होत्या. त्यांनी केलेल्या गुन्ह्यांच्या तपासांपैकी १२ गंभीर गुन्ह्यात आरोपींना शिक्षा झाली आहे. २०१७ मध्ये त्यांना पोलीस महासंचालकांनी पदक आणि प्रशंसापत्र देत सन्मानित केले होते.