धुळे – केंद्र सरकारच्या अमृत योजनेंतर्गत १७० कोटी रुपये खर्चून अक्कलपाडा पाणी पुरवठा योजना पुर्णत्वास आली असून, यापुढे धुळेकरांना दर दोन दिवसाआड नियमीत व स्वच्छ पाणी पुरवठा केला जाईल, असा दावा खासदार डॉ. सुभाष भामरे यांनी केला आहे.अक्कलपाडा पाणी पुरवठा योजनेसाठी स्वतंत्र ३३ केव्ही वीज पुरवठा करणारे उपकेंद्र सुरु करण्यात आले आहे. यानिमित्त खासदार भामरे यांनी अक्कलपाडा येथे प्रत्यक्ष भेट देवून उपसा केंद्राची पाहणी केली. यावेळी भाजप शहराध्यक्ष गजेंद्र अंपळकर, महापौर प्रतिभा चौधरी, उपमहापौर वैशाली वराडे, सभापती किरण कुलेवार आदी उपस्थित होते.
यावेळी भामरे यांनी अक्कलपाडा पाणी पुरवठा योजनेद्वारे १५ दिवसांपासून ८० टक्के धुळेकरांना दोन दिवसाआड पाणीपुरवठा होत असून उर्वरित भागातही आठवडाभरात दोन दिवसाआड पाणीपुरवठा सुरु होईल, असे सांगितले. अक्कलपाडा योजनेच्या उपसा केंद्रात पाच पंप आहेत. त्यापैकी एकाच वेळी तीन पंप सुरु ठेवले जातील, एक नादुरस्त झाल्यास पर्यायी पंप कार्यान्वित केला जाईल. एकावेळी एक पंप ताशी १०.५० लक्ष लिटर पाणी ओढतो, अशा पध्दतीने तीन पंपांद्वारे सुमारे ३२ लाख लिटर पाणी पुरवठा होईल. त्यामुळे भविष्यात पाणी पुवठा करण्यास अडथळा निर्माण होणार नाही. भाजप व केंद्र सरकारच्या माध्यमातून ही योजना पूर्णत्वास आली आहे. यामुळे भूलथापा देणार्यांवर धुळेकरांनी विश्वास ठेवू नये, असे आवाहन भामरे यांनी केले.