लोकसत्ता विशेष प्रतिनिधी
नाशिक : आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर, गोदावरी प्रदूषणमुक्तीसाठी महानगरपालिकेने सांडपाणी प्रक्रियेसाठी १३०० कोटींच्या काढलेल्या निविदा प्रक्रियेची तपासणी करून सुस्पष्ट अहवाल अभिप्रायासह सादर करण्याचे आदेश नगरविकास विभागाने आयुक्तांना दिले आहेत.
१३०० कोटी रुपयांच्या या निविदा प्रक्रियेबाबत शिवसेनेचे (एकनाथ शिंदे) महानगर प्रमुख प्रवीण तिदमे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे तक्रार केली होती. उपमुख्यमंत्री शिंदे यांनी तक्रारीची दखल घेत निविदा प्रक्रियेची तपासणी करून अहवाल सादर करण्याचे आदेश नगरविकास विभागाच्या प्रधान सचिवांना दिले होते. त्यानुसार वस्तुनिष्ठ अहवाल सादर करण्याचे आदेश मनपा आयुक्तांना देण्यात आले आहेत. सांडपाणी प्रक्रिया केंद्राच्या निविदा प्रक्रियेवर तिदमे यांनी हरकत नोंदवत संशय व्यक्त केला होता. विशिष्ट ठेकेदारासाठी मनपा अधिकारी सर्वांना समान संधी न देता ही प्रक्रिया राबवित असल्याचा आरोप त्यांनी केला होता.
निविदा प्रक्रियेपूर्वी राज्य व केंद्र शासन, प्रदूषण नियंत्रण मंडळ, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांच्या परवानग्या घेतल्या का, परवानग्या न घेता निविदा प्रक्रिया राबविली गेल्यास केंद्राकडून निधीच न मिळण्याचा धोका असल्याकडे तिदमे यांनी लक्ष वेधले होते. उपमुख्यमंत्री शिंदे यांनी तक्रारीची दखल घेऊन निविदा प्रक्रियेची तपासणी करून अहवाल सादर करण्याचे आदेश नगरविकास विभागाच्या प्रधान सचिवांना दिले होते. त्या अनुषंगाने वस्तुनिष्ठ अहवाल सादर करण्याचे आदेश मनपा आयुक्तांना देण्यात आले आहेत.