अखिल भारतीय मुस्लिम मराठी साहित्य परिषदेच्या वतीने येथे २८ आणि २९ जानेवारी रोजी नवव्या अखिल भारतीय मुस्लिम मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. संमेलनाध्यक्ष म्हणून अब्दुल कादर मुकादम उपस्थित राहणार असून ज्येष्ठ पत्रकार आरफा खानम शेरवानी यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन होणार आहे.दादासाहेब गायकवाड सभागृहात होणाऱ्या संमेलनाच्या तयारीला वेग आला आहे. स्वागताध्यक्ष म्हणून शेख इरफान रशीद, कार्याध्यक्ष म्हणून हसन दादामिया मुजावर, ज्येष्ठ साहित्यिक उत्तम कांबळे उपस्थित राहणार आहेत. उद्घाटन सोहळ्यापूर्वी चित्ररथ काढण्यात येणार असून पथनाट्यही सादर करण्यात येणार आहे. पुस्तक प्रकाशनही होणार आहे.
हेही वाचा >>>जळगावातील बावरी कुटुंबातील पाच जणांवर मोक्कांतर्गत कारवाई
उद्घाटन सोहळ्यानंतर दुपारी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात मुस्लिमांचे प्रश्न, वास्तव आणि अपेक्षा या विषयावर परिसंवाद होणार आहे. परिसंवादाच्या अध्यक्षस्थानी प्रा. फ. म. शहजिंदे राहणार आहेत. साहित्य आणि सांस्कृतिक दहशतवाद या विषयावर प्रा. जावेदपाशा कुरेशी यांच्या उपस्थितीत परिसंवाद होणार आहे. सायंकाळी फातिमाबीच्या लेकींचे कवी संमेलन होणार आहे. यावेळी फरजाना डांगे अध्यक्ष म्हणून उपस्थित राहणार आहेत. रात्री संमेलन अध्यक्ष अब्दुल कादर मुकादम यांची प्रकट मुलाखत होणार आहे. त्यानंतर बहुभाषिक कवीसंमेलन आणि मुशायरा होणार आहे. मुबारक शेख अध्यक्षस्थानी असतील. या कार्यक्रमात २० पेक्षा अधिक शायर, कवी यात सहभागी होणार आहेत.
हेही वाचा >>>नाशिक : बनावट माहितीपत्रकाच्या आधारे घेतले कर्ज, आयडीएफसी फर्स्ट बँकेला ५४ लाखांचा चुना
संमेलनाच्या दुसऱ्या दिवशी २९ जानेवारी रोजी सकाळी मुस्लिम मराठी साहित्य चळवळीची तीन दशके – साहित्य, सांस्कृतिक व सामाजिक अन्वयार्थ या विषयावर डॉ. अजीज नदाफ यांच्या अध्यक्षतेखाली परिसंवाद होणार आहे. आम्ही भारताचे लोक या विषयावर डॉ. अलीम वकील यांच्या अध्यक्षतेखाली परिसंवाद होईल. दुपारच्या सत्रात माजी कुलगुरू डॉ. एस. एन. पठाण यांच्या अध्यक्षतेखाली वर्तमान स्थितीतील मुस्लिम मराठी साहित्यामधील सामाजिक व सांस्कृतिक वेध या विषयावर परिसंवाद होईल. मुकादम यांच्या उपस्थितीत दुपारी चार वाजता संमेलनाचा समारोप होणार आहे.