प्रल्हाद बोरसे

मालेगाव : इमारत बांधकामास अडथळा ठरणाऱ्या महाकाय वटवृक्षावर कुऱ्हाड चालवण्याऐवजी त्याचे पुनर्रोपण करण्याचा मालेगाव महापालिकेचा प्रयोग यशस्वी झाला आहे. या प्रयोगाचे तमाम वृक्षप्रेमींनी मनस्वी स्वागत केले असून त्या निमित्ताने वृक्ष संवर्धनाचा चांगला संदेशही जनसामान्यांमध्ये गेला आहे.

 येथील सटाणा रस्त्यावरील महिला व बाल रुग्णालयाच्या विस्तारीकरण कामास शासनाने मंजुरी दिली आहे. त्यासाठी बांधण्यात येणाऱ्या इमारतीस तेथील एक वटवृक्ष अडथळा ठरत होता. त्यामुळे हा वृक्ष तोडून टाकण्याच्या परवानगीसाठी महापालिकेतील वृक्ष प्राधिकरणाकडे अर्ज सादर झाला होता. त्या अनुषंगाने उद्यान अधीक्षक नीलेश पाटील यांनी जागेवर जाऊन पाहणी केली असता साधारणत: २५ वर्षे जुन्या, ३५ फुट उंचीच्या या हिरव्या व डोलदार महाकाय वृक्षावर कुऱ्हाड चालविणे योग्य होणार नाही, अशी त्यांची भावना झाली. या दरम्यान कृषिमंत्री दादा भुसे यांच्या उपस्थितीत मध्यंतरी झालेल्या एका बैठकीत महिला व बाल रुग्णालयाच्या नियोजित इमारतीचे काम सुरू होण्यास होत असलेला विलंब हा विषय चर्चेला आला. त्यात इमारतीच्या बांधकामासाठी जुना वटवृक्ष तोडण्याची नामुष्की येणार असल्याची बाब समोर आली. त्यानंतर स्वत: भुसे, उपमहापौर नीलेश आहेर, आयुक्त भालचंद्र गोसावी यांनी नियोजित इमारतीच्या बांधकामाबरोबर वृक्ष वाचविण्याचाही चंग बांधला.

त्यानुसार प्रारंभी इमारतीच्या आराखडय़ात बदल करण्यासाठीची चाचपणी झाली. परंतु या वृक्षाची जागा टाळून इमारतीचा आराखडा करणे शक्य नसल्याची वस्तुस्थिती बांधकाम विभागाने मांडली. त्यानंतर वटवृक्षाचे अन्य जागेवर पुनरेपन करण्याचा पर्याय पुढे आला व त्यानुसार अंतिमत: महापालिकेने हे कार्य सिध्दीस नेले. वटवृक्ष पुनरेपनासाठी महापालिकेने गुजरातच्या वडोदरा येथील बालाजी एंटरप्रायझेस या व्यावसायिक संस्थेची निवड केली. राजस्थानच्या वाळवंटात अशाप्रकारे वृक्ष पुनरेपन केल्याचा या संस्थेकडे दांडगा अनुभव आहे. प्रारंभी वटवृक्षाच्या फांद्या व पारंब्या छाटण्यात आल्या. मुख्य मुळांना इजा पोहोचणार नाही, अशा तऱ्हेने बुंध्याभोवती आणि खोल असा १० फूट जेसीबी यंत्राने खड्डा खोदण्यात आला. सर्व मुळे उघडे झाल्यावर क्रेनच्या सहाय्याने अलगदपणे उचलून हा वृक्ष एका ट्रॉलीवर आडवा ठेवण्यात आला. तत्पूर्वी वृक्षाच्या मुळांवर जैविक औषधांची फवारणी करण्यात आली. तसेच कोणतीही इजा होऊ नये म्हणून ही मुळे कापडाने व्यवस्थित गुंडाळण्यात आली. 

येथील मसगा. महाविद्यालयाच्या कुंपनालगत नव्यानेच झालेल्या जॉगिंग ट्रॅकजवळ या वटवृक्षाचे पुनरेपन करण्यात आले. त्यासाठी दहा फूट लांब, दहा फूट रुंद व दहा फूट खोलीचा खड्डा खोदण्यात आला होता. पुनरेपनापूर्वी या खड्डयात आवश्यक त्या प्रमाणात पाणी, जैविक खत व कसदार माती टाकण्यात आली. वृक्ष पुनरेपणाचे हे काम सहा तासांत पूर्णत्वास गेले. त्यासाठी २५ हजारांचा खर्च आला आहे. पुनरेपन होऊन आता काही दिवस उलटले असून या वटवृक्षाला नव्याने चांगले फुटवे फुटत असल्याने हा प्रयोग यशस्वी झाल्याचे अधोरेखित होत आहे. एकात्मता चौक ते मसगा. महाविद्यालय या रस्त्यावर दर्शनी भागात झालेल्या या वटवृक्षाचे पुनरेपन बघण्यासाठी उत्सुकता म्हणून लोक भेटी देत आहेत.

मालेगावात वटवृक्षाचे पुनरेपन होण्याची ही एक आगळीवेगळी घटना आहे. त्यामुळे पर्यावरण व वृक्ष संवर्धनासंदर्भात लोकांमध्ये सकारात्मक संदेश गेला आहे. अशाप्रकारे वृक्ष पुनरेपणासाठी भविष्यातही काळजी घेतली जाईल.

– भालचंद्र गोसावी (आयुक्त मालेगाव महापालिका)

Story img Loader