नाशिक: भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमान्वये दाखल गुन्ह्यात जामीन नियमित करण्यासाठीच्या सुनावणीवेळी संशयित शिवसेना ठाकरे गटाचे महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांच्यासह अन्य दोघे न्यायालयात उपस्थित नसल्याने सरकारी वकिलांनी तीव्र आक्षेप नोंदविला. न्यायालयाने जामीन प्रकरणाची पुढील सुनावणी १७ जानेवारी रोजी ठेवली असून त्यावेळी संशयित सुधाकर बडगुजर, साहेबराव शिंदे आणि सुरेश चव्हाण यांना हजर राहण्याचे निर्देश दिले आहेत.
कुख्यात दाऊद इब्राहिमचा साथीदार सलीम कुत्ता याच्यासोबत पार्टी केल्याच्या संशयाने अडचणीत आलेले ठाकरे गटाचे नाशिक महानगरप्रमुख बडगुजर यांच्या विरोधात बनावट कागदपत्रे सादर करून महानगरपालिकेची फसवणूक केल्या प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केला आहे. भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियमान्वये दाखल गुन्ह्याचा तपास सुरू आहे. या गुन्ह्यात विशेष न्यायालयाने बडगुजर, शिंदे व चव्हाण यांना नऊ जानेवारीपर्यंत अंतरीम जामीन मंजूर केला होता.
हेही वाचा… नाशिक : शबरी घरकुलांसाठी इगतपुरीत मोर्चा
जामीन नियमित करण्यासाठी विशेष न्यायालयात सुनावणी झाली. त्यावेळी संशयित उपस्थित नसल्याबाबत विशेष सरकारी वकील पंकज चंद्रकोर यांनी तीव्र आक्षेप नोंदविला. यावेळी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून तपासी अधिकारी विश्वजीत जाधव यांनी युक्तीवाद केला. न्यायालयाने या प्रकरणाची सुनावणी १७ जानेवारी रोजी ठेवली आहे. या सुनावणीवेळी संशयित बडगुजर, शिंदे व चव्हाण यांना हजार राहण्याचे आदेश दिले आहेत.