नाशिक – भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमान्वये दाखल गुन्ह्यातील संशयित शिवसेना ठाकरे गटाचे महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांच्यासह अन्य दोघांच्या जामीन प्रकरणाची पुढील सुनावणी २० जानेवारी रोजी होणार आहे. बडगुजर यांना नियमित जामीन देण्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने विरोध केला आहे. बुधवारी दोन्ही पक्षांकडून तीन तास युक्तीवाद झाला.
कुख्यात दाऊद इब्राहिमचा साथीदार सलीम कुत्ता याच्यासोबत पार्टी केल्याच्या संशयाने अडचणीत आलेले ठाकरे गटाचे नाशिक महानगरप्रमुख बडगुजर यांच्या विरोधात बनावट कागदपत्रे सादर करून महानगरपालिकेची फसवणूक केल्या प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केला आहे. भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमान्वये दाखल गुन्ह्याचा तपास सुरू आहे. या गुन्ह्यात विशेष न्यायालयाने बडगुजर, साहेबराव शिंदे आणि सुरेश चव्हाण यांना नऊ जानेवारीपर्यंत अंतरीम जामीन मंजूर केला होता. जामीन नियमित करण्यासाठीच्या मागील सुनावणीवेळी बडगुजर यांच्यासह अन्य दोघे न्यायालयात उपस्थित नव्हते. त्यास सरकारी वकिलांनी तीव्र आक्षेप नोंदवला होता. न्यायालयाने जामीन प्रकरणाची पुढील सुनावणी १७ जानेवारी रोजी ठेवली. त्यावेळी तिन्ही संशयितांना हजर राहण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार बडगुजर व अन्य संशयित न्यायालयात हजर झाले. जामीन नियमित करण्यासाठी न्यायालयात सुनावणी झाली. बडगुजर यांना नियमित जामीन मंजूर करू नये, अशी विनंती तपास यंत्रणेने केली. दोन्ही बाजुंचे म्हणणे न्यायालयाने ऐकून घेतले. या प्रकरणाची पुढील सुनावणी २० जानेवारी रोजी ठेवली आहे.