भाजपा आमदार नितेश राणे यांनी आज (१५ डिसेंबर) विधीमंडळ अधिवेशनादरम्यान ठाकरे गटाचे नाशिकमधील पदाधिकारी सुधाकर बडगुजर यांचे मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपीबरोबरचे काही फोटो दाखवत गंभीर आरोप केले. राणे यांनी बडगुजर यांचे १९९३ च्या मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणातील मुख्य आरोपी सलीम कुर्लाबरोबरचे फोटो दाखवून बडगुजर यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली. ही मागणी नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे यांनीदेखील लावून धरली. दादा भुसे म्हणाले, ठाकरे गटाचे नाशिक महानगरप्रमुख देशद्रोह्यांबरोबर अशी डान्स पार्टी करत असतील तर ही गंभीर बाब आहे. तसेच बडगुजर हा खूप छोटा मासा आहे. त्याच्यावर कोणाचा वरदहस्त आहे याची खोलात जाऊन चौकशी करण्याची गरज आहे.
आमदार राणे आणि मंत्री भुसे यांनी विधानसभेत केलेल्या या आरोपांनंतर सुधाकर बडगुजर यांनी पत्रकार परिषद घेऊन त्यांच्यावरील आरोपांना उत्तर दिलं. बडगुजर म्हणाले, माझ्यावर आरोप करण्याआधी त्यांनी माहिती घ्यायला हवी होती. २०१६ साली विजया रहाटकर यांनी नाशकात सभा घेऊन वेगळ्या विदर्भाची मागणी केली होती. त्या सभेविरोधात आम्ही आंदोलन केलं. त्यावेळी माझ्यासह अनेक शिवसैनिकांवर गुन्हे दाखल झाले होते. मला याप्रकरणी १४ दिवस तुरुंगात जावं लागलं. मी नाशिक मध्यवर्ती कारागृहात होतो. तिथे बॉम्बस्फोटातील आरोपीदेखील होते. परंतु, आम्हाला त्याची काही कल्पना नव्हती.
बडगुजर म्हणाले, सलीम कुर्लाशी माझं नाव जोडलं गेलं. परंतु, त्याला १९९२-९३ ला अटक झालेली आणि मी २०१६ ला नाशिक तुरुंगात गेलो. जो व्हिडीओ दाखवला जातोय त्यात चुकीच्या पद्धतीने मॉर्फिंग केलं आहे. गुन्हेगार तुरुंगात असेल तर मग तो बाहेर कसा काय आला? किंवा तो पॅरोलवर असताना सार्वजनिक कार्यक्रमात आमची भेट झालेली असू शकते. परंतु, मला काही माहिती नाही. माझा कधी त्याच्याशी संबंध आला नाही. मध्यवर्ती कारागृहात असताना मी तिथे वावरलो आहे. तसेच सार्वजनिक जीवनात आमची कुठे भेट झाली असेल तर मला काही माहिती नाही. किंवा ते मॉर्फिंग असू शकतं. याप्रकरणी मी पोलिसांना सहकार्य करेन.
हे ही वाचा >> “ठाकरे गटातील नेत्याची बॉम्बस्फोटातील आरोपीबरोबर पार्टी”, भाजपाकडून फोटो जाहीर, गृहमंत्र्यांकडून चौकशीचे आदेश
ठाकरे गटाचे नाशिक महानगर प्रमुख म्हणाले, याप्रकरणी ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे माझ्याशी बोलल्या. त्यामुळे त्या प्रसारमाध्यमांशी बोलतील. मी त्यांना या प्रकरणाची संपूर्ण माहिती दिली आहे. अलिकडे इथे दाऊद इब्राहिमच्या नातेवाईकाचं लग्न झालं. त्या लग्नाला अनेक आमदार आणि मंत्री आले होते. समाजमाध्यमांवर त्याची व्हिडीओ क्लिप व्हायरल होत आहे. तिथे पोलीसही होते. प्रफुल्ल पटेल आणि इक्बाल मिर्ची यांचं एक जॉईंट व्हेंचर आहे, दोघांमध्ये करार आहे. त्याचं पुढे काय झालं?