आदित्य ठाकरे आज मनमाड दौऱ्यावर असताना शिंदे गटातील आमदार सुहास कांदे चांगलेच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. त्यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली. आदित्य ठाकरेंनी मनमाडच्या विकासासाठी काहीही केले नाही, असा आरोप कांदे यांनी केला. तसेच एका सभेमध्ये बोलताना कांदे यांनी आदित्य ठाकरे हे वाघच आहेत. मात्र त्यांनी भूमिका बदलली. त्यांनी मटणाऐवजी डाळ-भात खाण्यास सुरुवात केली, असा टोला लगावला.
हेही वाचा >>> नक्षलवाद्यांनी एकनाथ शिंदेंच्या हत्येचा कट आखला होता? तत्कालीन गृहराज्यमंत्री सतेज पाटलांनी दिलं उत्तर, म्हणाले…
“विधानसभेच्या पायऱ्यांवरुन आदित्य ठाकरे चालत होते. त्यावेळी नारायण राणे यांचे पुत्र नितेश राणे यांनी म्यॅव म्यॅव केलं. म्यॅव म्यॅव केले तरी मुंबईत एकही आमदार बोलला नाही. मग माझ्यातील शिवसैनिक जागा झाला. मग मी त्यांना सांगितलं की आम्ही म्यॅव म्यॅव नाहीयेत. वाघाच्या पोटी वाघच जन्माला येतो. आदित्य ठाकरे हे वाघच आहेत. पण त्यांनी आज भूमिका बदलली. त्यांनी मटण खाण्याऐवजी डाळ-भात खायला सुरुवात केली,” असे सुहास कांदे म्हणाले.
हेही वाचा >>> “गद्दारांची प्रश्न विचारण्याची लायकी नसते,” सुहास कांदेंच्या आरोपानंतर आदित्य ठाकरेंचे टीकास्त्र
याआधी “आदित्य ठाकरे आतापर्यंत एकदाच मनमाडला आले आहेत. मनमाडच्या विकासात आदित्य ठाकरेंचं एक टक्कादेखील योगदान नाही, हे मी छातीठोकपणे सांगतो. आदित्य ठाकरेंनी हा प्रकल्प मी दिला आहे आणि त्यासाठी पैसे दिल्याचं सांगून दाखवावं. मनमाड शहरात किंवा नांदगाव मतदारसंघात येऊन तुमच्या पर्यटन खात्याचा एक प्रकल्प दाखवा,” असे आव्हान सुहास कांदे यांनी आदित्य ठाकरेंना दिले होते.