जळगाव : अडीच वर्षांपूर्वी भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण होऊनही त्याचे पैसे आतापर्यंत शेतकर्यांना मिळालेले नाहीत. यासंदर्भात वारंवार पाठपुरावा करूनही न्याय मिळत नसल्याने हतबल झालेल्या बोदवड तालुक्यातील धोंडखेडा येथील शेतकर्याने गुरुवारी दुपारी भुसावळ येथील न्यायालयाच्या आवारात आत्महत्येचा प्रयत्न केला.
बोदवड तालुक्यातील धोंडखेडा येथील शेतकरी दयाराम सुनस्कर यांच्या शेतजमिनीची भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. गेल्या अडीच वर्षांपासून भूसंपादनाचे पैसे मिळत नसल्याने दयाराम सुनस्कर यांनी प्रशासकीय स्तरावर पाठपुरावा सुरू ठेवला होता. मात्र, प्रशासनाकडून टाळाटाळ होत असल्याने त्यांनी भुसावळ येथील न्यायालयात आत्मदहनाचा प्रयत्न केला. मात्र, वेळीच भुसावळ येथील शहर पोलीस ठाण्याच्या कर्मचार्यांनी त्यांना ताब्यात घेतल्यामुळे पुढील अनर्थ टळला.
हेही वाचा: जळगाव: न्यायमंदिर आवारातच विभक्त पती-पत्नीत हाणामारी; पती गंभीर जखमी
दरम्यान, दयाराम सुनस्कर यांनी भुसावळ येथील न्यायालयाच्या न्यायाधीशांना याआधीच पत्र दिले होते. पत्रात, मला भूसंपादनाचे पैसे मिळत नसल्यामुळे भुसावळ न्यायालयाच्या आवारात १७ नोव्हेंबर रोजी सकाळी अकराला आत्मदहन करेन, असा इशाराही त्यांनी दिला होता. याला सरकार जबाबदार राहील, असे पत्रात म्हटले होते. त्याअनुषंगाने न्यायाधीशांनी संबंधित बाब भुसावळ येथील शहर पोलीस ठाण्याच्या अधिकार्यांना कळविली. त्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल होऊन दयाराम सुनस्कर यांना ताब्यात घेत त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केल्यानंतर त्यांना पुन्हा न्यायालयात हजर करण्यात येणार आाहे.