कविवर्य नारायण सुर्वे सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने देण्यात येणारा क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले राष्ट्रीय पुरस्कार कर्नाटकातील धारवाड येथील बंडखोर कवयित्री सुकन्या मारुती यांना जाहीर झाला आहे. येत्या ३ जानेवारी रोजी दुपारी १ वाजता परशुराम साईखेडकर नाटय़ मंदिरात आयोजित सोहळ्यात या पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे.

यंदा या पुरस्काराचे १५ वे वर्ष आहे. कुलगुरू कलबुर्गी यांच्या शिष्या सुकन्या मारुती यांची या पुरस्कारासाठी निवड झाली आहे. कॉ. गोविंद पानसरे यांच्या पत्नी उमाताई पानसरे यांच्या हस्ते तसेच जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा विजयश्री चुंभळे, वाचनालयाचे अध्यक्ष उत्तम कांबळे यांच्या प्रमुख उपस्थितीत मारुती यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.

अकरा हजार रुपये, स्मृतिचिन्ह, मानपत्र व शाल असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. सुकन्या यांनी वर्षांनुवर्षे देवदासी प्रथेविरोधात आवाज उठविला. त्यांची आई देवदासी होती. आपल्याला वडिलांचे नाव मिळावे यासाठी त्यांनी संघर्ष केला. समाजातील विषमता, अंधश्रद्धा, रुढीप्रथा यांच्याविरुद्ध त्यांनी लढाई सुरू केली. बंडखोर आणि विद्रोही कविता लिहून कर्नाटकातील ‘बंडाय साहित्यात’ त्यांनी आपले स्थान निर्माण केले. शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रात त्यांनी केलेल्या कामांचा गौरव आजवर अनेक पुरस्कारांनी करण्यात आला आहे.

Story img Loader