नंदुरबार : जिल्ह्यात चोऱ्या आणि घरफोड्यांचे सत्र सुरुच आहे. विशेषत: शहराबाहेरील वसाहतींना चोरट्यांनी लक्ष केले आहे. रविवारी मध्यरात्री चोरट्यांनी जिल्हा परिषद अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या वसाहतीतील चार इमारतींमधील १३ घरांची कुलूपे तोडून चोरीचा प्रयत्न केला. मात्र, त्यातील ११ घरांमध्ये कोणीही राहत नसल्याने चोरट्यांच्या पदरी निराशा आली. एका घरातून लॅपटॉप तर आणखी दुसऱ्या एका घरातून सोने चांदीसह सुमारे सव्वा लाखांचा ऐवज लंपास केला. एक दुचाकीही चोरण्यात आली. विशेष म्हणजे या वसाहतीपासून पोलीस अधीक्षक कार्यालय अवघ्या दोनशे ते अडीचशे मीटरवर आहे.

जिल्हा परिषदेत कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी शेजारीच शासकीय निवासस्थाने उपलब्ध करुन देण्यात आली आहे. यामध्ये विविध इमारतींमध्ये कर्मचारी तर काही अधिकारीदेखील राहतात. या निवासस्थानांची दुरवस्था झाल्याने बहुसंख्ये निवासस्थाने रिकामीच असून कुलूपबंद आहेत. मध्यरात्री चोरट्यांनी या वसाहतीतील चार इमारतींमधील तब्बल १३ घरे फोडली. यातील ११ घरांमध्ये कोणीही राहत नसल्याने नुसतेच कुलूप व कडीकोंडा तोडल्याचे दिसून आले. रंगावली या इमारतीतील रहिवासी कविता अहिरे या महिला बालकल्याणमध्ये परिचर म्हणून कार्यरत आहेत. त्या शहरातील पटेलवाडीमध्ये राहत असलेल्या त्यांच्या आईकडे गेल्या होत्या. चोरट्यांनी त्यांच्या घराचे कुलूप तोडून सव्वा लाखाहून अधिकचा ऐवज लंपास केला. अहिरे यांच्या तक्रारीवरुन शहर पोलिसात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच एका घरातून कानोळे यांचा लॅपटॉप चोरीला गेल्याची माहिती स्थानिक रहिवाश्यांनी दिली. याशिवाय कुमावत यांची दुचाकी चोरण्यात आली.

एकाच रात्रीतून १३ घरांची कुलूपे तोडण्यात आली. यामध्ये तापी इमारतीतील चार, रंगावलीतील तीन, गोदावरीमधील तीन तर शिवण इमारतीत तीन घरांचे कुलूप तोडण्यात आले. घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी संजय महाजन, नंदुरबार शहर पोलीस निरीक्षक अमितकुमार मनेळ, निरीक्षक विकास गुंजाळ यांच्यासह पोलीस पथकाने भेट दिली.

वसाहतीची सुरक्षा वाऱ्यावर

नंदुरबार जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांचे शासकीय निवासस्थाने असलेल्या या वसाहतीची सुरक्षा वाऱ्यावर असल्याचे दिसून आले. सुरुवातीला असलेले प्रवेशव्दार तुटलेले असल्याने सहजच कोणीही प्रवेश करतो. सुमारे पाच वर्षापासून सुरक्षा रक्षकच नसल्याचे वास्तव आहे. अनेक पथदीप बंद आहेत. एकही सीसीटीव्ही नाही.

वसाहतीतील प्रवेशव्दाराची दुरूस्ती, सुरक्षा रक्षक नेमण्यात येईल. सर्वच कामे युध्द पातळीवर करण्याच्या दृष्टीने नियोजन करत आहोत.सावन कुमार (मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, नंदुरबार)