दुष्काळी परिस्थितीतही शेतकऱ्यांची यशोगाथा
दुष्काळी परिस्थितीतही तालुक्यातील काही प्रगतिशील शेतकऱ्यांनी आपल्या द्राक्षबागा जिवंत ठेवल्या आहेत. येथील शेतकरी कामेश पगार यांच्या आठ एकर शेतातील जम्बो ब्लॅक जातीच्या निर्यातक्षम द्राक्षांची हॉलंडमधील दोन व्यापाऱ्यांनी पाहणी केली. हॉलंड येथील मेटा आणि लॅमी समा अशी या व्यापाऱ्यांची नावे आहेत.
सध्या हे व्यापारी भारतातून युरोपात मासे, डाळिंब आणि इतर फळांची निर्यात करीत आहेत. कळवण तालुक्यातील निर्यातक्षम द्राक्षांची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी द्राक्षांची पाहणी करण्यासाठी कळवण गाठले. कळवण तालुक्यातून द्राक्ष खरेदी करून जपान, जर्मनी, बेल्जियम, अमेरिका येथे निर्यात करण्याची त्यांची योजना आहे. त्यांनी भेंडी येथील निर्यात सुविधा केंद्रास भेट देऊन शीतगृह आणि कांद्याची प्रतवारी करणाऱ्या यंत्रणेची पाहणी केली. या वेळी शेतकरी सुधाकर पगार, तालुका कृषी अधिकारी विजय पाटील, शेतकरी सहकारी संघाचे अध्यक्ष निंबा पगार, बाजार समितीचे व्यवस्थापक रवींद्र हिरे, लाला पगार, कामेश पगार आदी उपस्थित होते.
नाशिकचे पणन व्यवस्थापक सुनील पवार यांच्या सहकार्याने हॉलंड येथील व्यापारी लॅमी समा आणि मेटा हे नाशिक जिल्ह्यात आले आहेत. ते भाजीपाला, द्राक्ष आणि डाळिंब खरेदी करणार आहेत. जानेवारीपासून खरेदीला सुरुवात होणार आहे.
– प्रशांत नहारकर (दुकानदार)
आम्ही जम्बो ब्लॅक जातीच्या द्राक्षांची आठ एकरांमध्ये लागवड केली आहे. फळ धारणेचे पहिलेच वर्ष असून १४ ते १६ महिन्यांत द्राक्ष काढणीचे नियोजन केले होते. साधारण महिन्यात फळ विक्रीसाठी तयार होणार असून एकरी १० टन उत्पन्न अपेक्षित आहे.
– कामेश पगार (द्राक्ष उत्पादक)