महिलांवरील अत्याचाराच्या घटनांसह इतर गुन्हे वाढत असल्याने गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस कुचकामी ठरले आहेत. त्यांच्यावर असलेली पालकमंत्री तसेच अन्य काही मंत्रिपदांची जबाबदारी पाहता सत्ताकेंद्री भाजपमध्ये कोणीच लायक नाही का, असा प्रश्न शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केला आहे. गृहमंत्री म्हणून आपली पकड ढिली होत असल्याचे लक्षात घेत फडणवीस यांनी आपल्या काही जबाबदाऱ्या इतरांना द्याव्यात, असा सल्लाही त्यांनी दिला.
हेही वाचा >>>सुषमा अंधारे यांचे मोठे विधान! शिंदे गटात अनेकजण नाराज असल्याचे म्हणत थेट नेत्यांची घेतली नावे, म्हणाल्या “लवकरच…”
रविवारी येथे एका कार्यक्रमानिमित्त आलेल्या अंधारे यांनी पत्रकारांशी संवाद साधताना फडणवीसांसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, भाजप महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांच्यावरही टीका केली. ताई सरका, असे म्हणणाऱ्याविरुध्द विनयभंगाचा गुन्हा दाखल करणारे गृहमंत्री बाबा रामदेव यांच्या अश्लिल विधानावर सारवासारव करीत असल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली.
महाप्रबोधन यात्रेनिमित्त आपण नाशिकमध्ये येऊ तेव्हां खा. हेमंत गोडसे, पालकमंत्री दादा भुसे, आ. सुहास कांदे यांना भेटणार आहे. त्यांच्याशी कुठलाही वाद नाही. पण ते भाजपच्या वळचणीला असल्याने आपले संस्कार विसरले आहेत. ते बहिणींशी कसे बोलतात, हे माध्यमांमधून लोक पाहत आहेत. परंतु, आपण त्यांच्याशी बोलणार, असे अंधारे यांनी सांगितले.
हेही वाचा >>>“नितू, निलू आगाऊ लेकरं,” सुषमा अंधारेंचा खोचक टोला; म्हणाल्या, “नारायण राणेंनी संस्कार…”
सुहास कांदेप्रमाणे संजय देशमुखही नाराज आहे. कामाख्या देवीच्या दर्शनाला जातांना स्वत:ला रेडे संबोधणे ही मनातील खदखद आहे. ती वेगवेगळ्या पध्दतीने बाहेर येत आहे. मुळात ही मंडळी मंत्रिपदाच्या आशेने शिंदे गटात गेली. त्यांचे पुनर्वसन झालेले नसल्याची सल वेगवेगळ्या माध्यमातून पुढे येईलच, असा दावाही अंधारे यांनी केला. संजय राठोड यांना भाजपने सत्तेत घेतले. अशा स्थितीत चित्रा वाघ यांनी भाजपमधील पदाचा राजीनामा देत स्वतंत्ररित्या लढाई लढल्यास आम्ही त्यांना साथ देऊ, असेही त्यांनी सांगितले. तत्कालीन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यावर कधी मंत्रालयात दिसले नसल्याची टीका करण्यात येत होती. एकनाथ शिंदे हे तरी कुठे मंत्रालयात असतात ? वेगवेगळ्या कार्यक्रमांना हजर राहणे, उरलेल्या वेळात हात दाखवित अवलक्षण करणे, असे त्यांचे काम सुरू आहे. अब्दुल सत्तार इमान नसणारी व्यक्ती आहे. मनात एक आणि तोंडावर वेगळं असा शिवसैनिक असूच शकत नाही. सत्तार यांची विधाने त्यांना शोभणारी नाहीत. शिंदे गट आणि भाजप यांच्यात संवाद नसल्याने २०२३ मध्ये मध्यावधी लागणार, अशी भविष्यवाणीही अंधारे यांनी केली.
हेही वाचा >>>सात वर्गांसाठी तीनच शिक्षक; संतप्त पालकांचे जिल्हा परिषद शाळेला कुलूप
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयीच्या विधानानंतर आक्रमक होणारे भाजप किंवा अन्य गटातील लोक शिवाजी महाराजांच्या मुद्यावर गप्प का ? राज्यपाल अनावधानाने बोलत नसून जाणूनबुजून अशी विधाने करुन महाराष्ट्राच्या अस्मितेला धक्का लावत आहेत. अशी व्यक्ती राज्यपाल पदावरून हटवा, अशी भूमिका शिवसेना ठाकरे गटाची असल्याचे सुषमा अंधारे यांनी सांगितले.