मनमाड – चोरलेल्या चिन्हावर शिंदे गटातील एकही आमदार निवडून येऊ शकत नाही. लोक फुटीरांना दारातही उभे करणार नाही. भाडोत्री लोकांवर अवलंबून राहणारे कांदे हे घाबरट आमदार आहेत, असे टिकास्त्र शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी सोडले. ठाकरे गटाची महाप्रबोधन यात्रा रविवारी जिल्ह्यात दाखल झाली. यानिमित्त मनमाड येथे सायंकाळी जाहीर सभेसाठी अंधारे जात असताना शिंदे गटाचे आमदार सुहास कांदे समर्थकांनी त्यांना काळे झेंडे दाखवून विरोध केला. अंधारे यांनी एकात्मता चौकात झालेल्या जाहीर सभेत आमदार कांदे यांना लक्ष्य करीत शिंदे गटासह भाजपवर टीका केली.
हेही वाचा >>> कसारा घाटात मालगाडी घसरल्याने रेल्वे वाहतूक विस्कळीत
कांदे यांच्या भाडोत्री गुंडांना आपण घाबरणार नसल्याचे त्यांनी प्रारंभीच ठणकावले. कांदे आणि आपल्यात फरक आहे. आपण इथे येऊन ताकतीने बोलू शकतो. कांदे यांना गर्दी जमवण्यासाठी, विरोधासाठी भाडोत्री माणसे लागतात. त्यांना घाबरलेले पाहून आपणास आनंद झाला. २०२४ मधील विधानसभा निवडणुकीत कांदे यांनी कितीही पैसे खर्च करावा, कितीही भाडोत्री माणसे आणावीत, मतदार त्यांना घरचा रस्ता दाखविणार असल्याचा दावा अंधारे यांनी केला. कांदे यांच्यासह ४० आमदारांनी भारतीय लोकशाहीचा खेळ केला. काही खोक्यांसाठी ते गायब झाले. नंतर हिंदुत्वासाठी गेल्याचे सांगितले. राष्ट्रवादीसोबत जाण्यालाही त्यांचा आक्षेप होता. मग आता राष्ट्रवादी अजित पवार गट सत्तेत सहभागी झाल्यानंतर ते बाहेर का पडले नाहीत, असा प्रश्न अंधारे यांनी उपस्थित केला.
हेही वाचा >>> जळगावात तरुणाचा खून; दोन जण जखमी
अवकाळी पाऊस व गारपिटीत जिल्ह्यात कांद्यासह अन्य पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. या नुकसानीला कोण जबाबदार, त्याची भरपाई कोण देणार, असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले. कांद्याबाबत केंद्र सरकारच्या धोरणावर त्यांनी आक्षेप घेतला. कांदा उपलब्ध असताना निर्यात बंदीचे धोरण अवलंबते जाते. कांदा जास्त असल्यास आयात करून भाव पाडले जातात. यावर कोणी बोलत नाही. बाजार समितीत निवडून आलेल्या लोकांना घाबरवले जाते. सामान्य माणसाची तक्रार घेण्यासाठी पोलिसांना १५ दिवस लागतात. संपूर्ण राज्यात नागरिकांची ही अवस्था असल्याचे अंधारे यांनी सांगितले.