मालेगाव येथील अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्याशी बळजबरीने निकाह लावण्याचा प्रयत्न आणि अत्याचार केल्याच्या संशयावरुन कॅम्प पोलिसांनी इमरान शेख याला सूरत येथून अटक केली आहे. पीडित मुलीची १८ दिवसांनी सुटका करण्यात पोलिसांना यश आले. दरम्यान,हा ‘लव्ह जिहाद’चा प्रकार असल्याची तक्रार करत संशयितास मदत करणाऱ्या सर्वच संशयितांवर कठोर कारवाई करावी,अशी मागणी हिंदुत्ववादी संघटनांनी येथे पत्रकार परिषदेत केली.
येथील कॅम्प भागातील आदिवासी समाजाच्या १४ वर्षाच्या अल्पवयीन मुलीचे २४ ऑक्टोबर रोजी अपहरण झाले होते. दुसऱ्या दिवशी मुलीच्या आईने कॅम्प पोलिसात आपल्या मुलीचे अपहरण झाल्याची तक्रार दाखल केली होती. तक्रार करताना संशयिताचे नाव देखील पोलिसांना देण्यात आले होते. मात्र पंधरा दिवस उलटूनही मुलीचा शोध घेण्यात पोलिसांना यश आले नव्हते. या संदर्भात हिंदुत्ववादी संघटनांनी तक्रारीचा सूर लावत दोन दिवसांत पीडित मुलीचा शोध आणि संशयिताला अटक झाली नाही तर मोर्चा काढण्याचा इशारा दिला होता. त्यानंतर पोलिसांची तपासाची चक्रे वेगाने फिरली. त्यानुसार सुरत येथून पीडित मुलीला आणि संशयित इमरान शेखला पोलिसांनी ताब्यात घेतले. या दोघांना मालेगावात आणल्यावर पोलिसांनी वैद्यकीय तपासणी केल्यावर पीडितेला आईच्या ताब्यात देण्यात आले.
सोमवारी न्यायालयापुढे उभे केले असता इमरान यास पाच दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली.
हेही वाचा: “आव्हाडांनी धक्का दिलाय की नाही, हे…”; विनयभंगप्रकरणी अमृता फडणवीसांची प्रतिक्रिया
या संदर्भात हिंदुत्ववादी संघटनांनी पत्रकार परिषद घेऊन या प्रकरणातील पोलिसांची एकूणच कार्यपद्धती कशी संशयास्पद राहिली, याचा पाढा वाचला. तसेच मुलीच्या अपहरणाचा सर्व घटनाक्रम सांगण्याचा प्रयत्न केला. २४ ऑक्टोबर रोजी अपहरण झालेल्या या मुलीला खासगी प्रवासी वाहनात बसवून नाशिक येथे नेण्यात आले. तेथून रत्नागिरीतील मुंजारवाडी येथे संशयित इमरानच्या नातेवाईकांकडे नेण्यात आले. तेथून तिला एका मांत्रिकाकडे नेण्यात येऊन तिच्या गळ्यात तावीज बांधण्यात आला. त्यानंतर तिचे धर्मांतरण करून तिचे ‘शाबिया’ असे नामकरण करण्यात आले. तसेच तिला काझीकडे नेऊन तिचा निकाह लावण्याचा प्रयत्नही केला गेला. मात्र त्यास तिने नकार दिला. तसेच घरी जाण्याचा आग्रह धरल्यावर संशयितांनी विरोध दर्शविल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली.
हेही वाचा: राज्यपाल, मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यामुळे नाशिक मध्ये रस्त्यांच्या डांबरीकरणाला वेग
पोलीस शोध घेत असल्याची माहिती समजल्यावर इमरान आणि त्याच्या नातेवाईकांनी मुंजारवाडीहून पीडितेला सुरतला नेले. तेथे इमरानच्या दुसऱ्या एका नातेवाईकाच्या घरी तिला ठेवण्यात आले. तेथूनच शनिवारी पोलिसांनी तिला ताब्यात घेतले. पोलीस आपल्या मागावर असल्याचे समजल्यावर इमरान तिथून गायब झाला होता. मात्र दुसऱ्या दिवशी त्याचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले. मुंजारवाडी येथील मुक्कामात संशयिताने पीडितेवर अत्याचार केल्याची माहिती या पत्रकार परिषदेत देण्यात आली. पोलिसांनी पीडितेची सोडवणूक करत आईच्या ताब्यात दिले आणि संशयिताला अटक केली असली तरी या सर्व प्रकरणात मदत करणारे संशयिताचे नातेवाईक, काझी, मांत्रिक अशा सर्वांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. पत्रकार परिषदेस भाजपच्या जिल्हा उपाध्यक्षा ॲड. मंजुषा कजवाडकर, विश्व हिंदू परिषदेचे जिल्हा सहमंत्री मच्छिंद्र शिर्के, जिल्हा धर्म प्रसार प्रमुख भावेश भावसार आदी उपस्थित होते.