जळगाव – तुम्हाला बघून घेतो, मला अंधारात ठेवून माझी जेल वर्ग पोलीस पार्टी लावली, अशा भाषेत अधीक्षकांना शिवीगाळ करीत गंभीर गुन्ह्यात कारागृहात दाखल असलेल्या बंद्याने खिडकीचा काचा, लोखंडी जाळी व इतर मालमत्तांचे नुकसान केल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहर पोलीस ठाण्यातील गंभीर गुन्ह्यात संशयित आरोपी लखन उर्फ गोलू मराठे हा न्यायालयाच्या आदेशानुसार तीन ऑगस्टपासून कारागृहात आहे.
हेही वाचा >>> धुळे : नापास झाल्याने धुळ्यात तरूणीची आत्महत्या
१३ ऑक्टोबरला न्यायदंडाधिकार्यांनी दिलेल्या आदेशानुसार गोलू मराठेची नाशिक रोड येथील मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्याअनुषंगाने पोलीस मुख्यालयातील पथक मंगळवारी कारागृहात मराठे याला घेण्यासाठी दाखल झाले. आपली नाशिक रोड येथील कारागृहात रवानगी करण्यात आल्याचे मराठे याला समजले. तुरुंग अधीक्षक ए. आर. वांडेकर हे इतर कर्मचारी व अधिकार्यांसह आपल्या कक्षात बसलेले असताना मराठे हा त्याच्या नातेवाइकाशी बोलण्यासाठी बॅरेक क्रमांक ७ मध्ये मुलाखत कक्षाकडे येत असताना कारागृह अधीक्षक कार्यालयामागील बाजूस खिडकीची लोखंडी जाळी हाताने काढत आणि काच हाताने तोडत तुरुंग अधीक्षक वांडेकर यांना म्हणाला, तुम्हाला बघून घेतो, मला अंधारात ठेवून माझी जेल वर्ग पोलीस पार्टी लावली, अशा भाषेत शिवीगाळ केली, तसेच बंद्याने परत कारागृहाच्या मुलाखत कक्षात जात अंतर्गत दूरध्वनी संचसुद्धा तोडला. याप्रकरणी वरिष्ठ तुरुंग अधिकारी गजानन पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.