लोकसत्ता प्रतिनिधी
जळगाव : चोपडा तालुक्यात मध्य प्रदेशच्या सीमेवरील उमर्टी गावात अवैध बंदूक निर्मिती करणाऱ्या संशयिताला पकडण्यासाठी गेलेल्या पोलीस पथकावर शनिवारी सायंकाळी जमावाने हल्ला केला. एका पोलिसाला ओलीस ठेवले. या हल्ल्यात सहायक निरीक्षकासह तीन पोलीस जखमी झाले. याप्रकरणी एका संशयिताला अटक करण्यात आली असून, न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्याचे सहायक निरीक्षक शेषराव नितनवरे यांच्या नेतृत्वाखाली हवालदार शशिकांत पारधी, दीपक शिंदे, चेतन महाजन, विशाल पाटील, किरण पारधी हे शनिवारी सायंकाळी उमर्टी गावात छापा टाकण्यासाठी गेले होते. उमर्टी हे गाव महाराष्ट्र तर नदीपलीकडे उमर्टी (पार) हे गाव मध्य प्रदेशात आहे. कारवाईदरम्यान, संशयिताला घेऊन पथक परतत असताना स्थानिकांनी त्यांना अडवले. जमाव आणि पोलिसांमध्ये संशयितास ताब्यात घेण्यावरुन वाद झाला. जमावातील काहींनी गावठी बंदुकीतून हवेत गोळीबार केल्यानंतर पोलिसांनीही प्रत्युत्तरादाखल हवेत दोनवेळा गोळीबार केला.
जमावाने हवालदार शशिकांत पारधी यांना ताब्यात घेत सहायक निरीक्षक नितनवरे आणि इतर पोलिसांना मारहाण केली. संबंधित प्रकाराची माहिती मिळाल्यानंतर जळगावच्या पोलीस अधीक्षकांनी चोपडा ग्रामीण आणि मध्य प्रदेशातील पोलिसांशी संपर्क साधत पथक रवाना केले. रात्री उशिरा हल्लेखोरांनी ओलीस ठेवलेल्या पोलीस कर्मचाऱ्याची सुटका केली. पोलिसांनी पप्पीसिंह सिकलगर (४५, उमर्टी-पार, जि. बडवानी, मध्य प्रदेश) या संशयिताला अटक केली आहे. अन्य संशयितांचा कसून शोध घेतला जात असल्याची माहिती चोपडा ग्रामीणच्या निरीक्षक कावेरी कमलाकर यांनी दिली. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी जखमी पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची रुग्णालयात विचारपूस केली.
मुख्यमंत्र्यांचे आदेश
उमर्टीत अवैध बंदूक निर्मिती आणि तस्करी करण्याशी संबंधित आणि पोलीस पथकावर हल्ला करणाऱ्यांवर कडक कायदेशीर कारवाई करण्याची सूचना मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. रविवारी जळगाव जिल्हा दौऱ्यावर फडणवीस आले असता विमानतळावर पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी घटनेची माहिती दिली.