कांद्याच्या गडगडणाऱ्या भावावरून राज्याचे सहकारमंत्री चंद्रकांत पाटील आणि सहकार राज्यमंत्री दादा भुसे यांना रविवारी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या रोषाचा सामना करावा लागला. निफाड शहरात एका पतसंस्थेच्या उद्घाटन सोहळ्यात सहकारमंत्र्यांचे भाषण सुरू असताना स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी महामार्गावर कांदा फेकत जोरदार घोषणाबाजी केली. या घटनाक्रमानंतर सहकारमंत्र्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला. कांद्याला आधारभूत किंमत देऊन बाजारात मिळणारा भाव आणि आधारभूत किंमत यातील फरकाची रक्कम देण्याचा शासन विचार करत असल्याचे त्यांनी सांगितले.

कांदाप्रश्नावर स्वाभिमानी शेतकरी संघटना सातत्याने आंदोलन करत आहे. सहकारमंत्री व राज्यमंत्री यांच्या उपस्थितीत लोकनेते दत्ताजी पाटील पतसंस्थेचे उद्घाटन झाले. या कार्यक्रमाकरिता नाशिक-औरंगाबाद रस्त्यावरील विंचूर चौफुलीजवळ सभामंडपाची उभारणी करण्यात आली. सहकार मंत्र्यांचे भाषण सुरू असताना ‘स्वाभिमानी’ संघटनेचे युवा प्रदेशाध्यक्ष हंसराज वडघुले यांच्या नेतृत्वाखाली २० ते २५ कार्यकर्ते विंचूर चौफुली येथे दाखल झाले. त्यांनी महामार्गावर कांदे टाकत संबंधितांनी घोषणाबाजीला सुरुवात केली. कांद्याला दोन हजार रुपये हमीभाव द्यावा, कांद्याबाबत र्सवकष धोरण जाहीर करावे, अशी मागणी करण्यात आली. अकस्मात झालेल्या आंदोलनाने पोलीस यंत्रणेची तारांबळ उडाली.

 

 

Story img Loader