अतिशय वाजतगाजत सुरू झालेल्या स्वच्छ भारत अभियानाचे वर्षभरानंतर अस्तित्व दिसत नसले तरी सर्वसामान्यांना तो स्वच्छ भारत उपकराच्या माध्यमातून भेटणार आहे. विविध बाबींवर लागू झालेला हा उपकर वाहन अनुज्ञप्ती काढतानादेखील भरावा लागेल. सेवा करात समाविष्ट करण्यात आलेल्या या उपकरामुळे ३० रुपये मूळ शुल्क लागणाऱ्या शिकाऊ अनुज्ञप्तीसाठी ३१, तर कायमस्वरूपी अनुज्ञप्तीकरिता २०० ऐवजी २१३ रुपये मोजावे लागतील. त्यात स्वच्छ भारत उपकराची रक्कम अनुक्रमे ०.०३ आणि ०.४४ रुपये इतकी आहे. स्वच्छता मोहीम विस्मृतीत गेली असताना लागू झालेल्या या कराने सर्वसामान्यांकडून आश्चर्य व्यक्त होत आहे.
पंतप्रधानांच्या संकल्पनेतून गतवर्षी स्वच्छ भारत अभियानाची संकल्पना मांडली गेली. अभियानाच्या प्रचार व प्रसिद्धीत अनेक दिग्गज मंडळी सहभागी झाल्यामुळे या प्रश्नावर प्रकाशझोत पडला. शासकीय आस्थापना, खासगी कारखाने, शैक्षणिक संस्था आदींनी या उपक्रमात सक्रिय सहभाग नोंदवत योगदान दिले. प्रारंभीच्या काळात धडाक्यात राबविलेले हे अभियान सद्य:स्थितीत सर्व पातळीवर थंडावले आहे. नाशिकचा विचार करता शासकीय व खासगी आस्थापनांनी सुरुवातीला दाखविलेला उत्साह आरंभशूरता ठरल्याचे लक्षात येते. अनेक घटकांचा सहभाग हा निव्वळ छायाचित्र काढण्यापुरताच मर्यादित ठरला. एकवार मोहीम राबविणाऱ्या अनेक शासकीय कार्यालयांची अवस्था पुन्हा ‘जैसे थे’ बनली आहे. कित्येक आस्थापनांना या अभियानाचा विसर पडला. बहुतेकांच्या दृष्टीने विस्मृतीत गेलेल्या या अभियानाची आठवण केंद्र सरकारने लागू केलेल्या स्वच्छ भारत उपकराने करून दिली आहे. वेगवेगळ्या सेवांवर हा उपकर लागू झाला आहे. त्यात वाहनधारक जी शिकाऊ व कायमस्वरूपी अनुज्ञप्ती काढतात त्याचाही अंतर्भाव आहे. मध्यंतरी या व्यवस्थेवर १४ टक्के सेवाकराची अंमलबजावणी झाली होती. त्यात या नव्या उपकराची भर पडल्याचे प्रादेशिक परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.
वाहन अनुज्ञप्ती काढताना मूळ शुल्काच्या १४ टक्के सेवा कर आणि ०.५ टक्के स्वच्छ भारत उपकर असा एकूण १४.५ टक्के कर भरावा लागणार आहे.
शिकाऊ अनुज्ञप्तीसाठी मूळ शुल्क ३० रुपये आहे. त्यात ०.७६ रुपये सेवाकर, तर ०.०३ टक्के स्वच्छ भारत उपकर असा एकूण ०.७९ रुपये कर भरावा लागेल. यामुळे या अनुज्ञप्तीसाठी ३१ रुपये शुल्क भरावे लागणार आहे. कायमस्वरूपी अनुज्ञप्तीसाठी मूळ शुल्क २०० रुपये इतके आहे. त्यात १२.२२ सेवा कर, तर ०.४४ भारत उपकर मिळून एकूण १२.६६ रुपये कर भरावा लागेल. यामुळे यासाठी आता २१३ रुपये सर्वसामान्यांना द्यावे लागतील. अनुज्ञप्तीसाठीची व्यवस्था प्रादेशिक परिवहन विभागाने सेवा पुरवठादारामार्फत उभारली आहे. त्यापोटी त्यास प्रत्येक अनुज्ञप्तीस काही विशिष्ट रक्कम द्यावी लागते.
या शुल्क वसुलीतून राज्य शासनाकडे शिकाऊ अनुज्ञप्तीतून प्रत्येकी २४.८२ रुपये, तर कायमस्वरूपी अनुज्ञप्तीतून प्रत्येकी ११३.०४ रुपये जमा होणार आहेत. प्रत्येक अर्जदारास शुल्क जमा केल्याची पावती देताना सेवाकराची रक्कम स्वतंत्रपणे दर्शविली जाईल. या उपकराचा बोजा अत्यल्प असला तरी ज्या कारणासाठी तो घेतला जात आहे, त्या स्वच्छतेचा स्थानिक पातळीवरही मागमूस दिसत नसल्याची नागरिकांची प्रतिक्रिया आहे. नागरिकांना वाहन परवाना देण्यासाठी शासन आधीच विशिष्ट रक्कम शुल्क म्हणून घेते. मग या शुल्कावर सेवा कर व स्वच्छता अधिभाराचा भार टाकण्याचे प्रयोजन काय, असा प्रश्नही काही जण उपस्थित करत आहेत.

Story img Loader