मालेगाव : प्रबळ इच्छाशक्तीच्या जोडीला चिकाटी आणि मेहनत घेण्याची तयारी असेल तर स्पर्धा परीक्षेतील यश मिळविण्यापासून कुणीच रोखू शकत नाही, हे येथील स्वप्निल अहिरे या तरुणाने सिद्ध केले. भारतीय प्रशासकीय सेवेसाठी केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे घेतलेल्या परीक्षेत सलग चारदा मुलाखतीपर्यंत मजल मारूनही यशाने हुलकावणी दिली, तरी खचून न जाता नेटाने अभ्यास सुरू ठेवणाऱ्या स्वप्निलने केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या भारतीय वन सेवा परीक्षेत घवघवीत यश मिळविले आहे. भारतात २९ वा आणि महाराष्ट्रात तिसरा क्रमांक मिळविणाऱ्या स्वप्निलची जिद्द व संयम खरोखरच वाखाणण्यासारखी आहे.

२०१६ मध्ये पुण्याच्या सीओईपी महाविद्यालयातून त्याने बी.टेक.ची पदवी घेतली. पदवीच्या अंतिम वर्षांला असताना त्याने केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी सुरू केली. तो तसेच याच महाविद्यालयाचे अन्य तीन अशा चौघा मित्रांनी त्यासाठी एक गट केला होता. योगायोगाने त्यातील दोघे ‘आयएएस’ तर एक जण ‘आयपीएस’ झाला. लागोपाठ झालेल्या गेल्या चार परीक्षांमध्ये स्वप्निलदेखील प्रत्येक वेळी पूर्व व मुख्य परीक्षांमध्ये उत्तीर्ण होत मुलाखतीपर्यंत मजल मारत होता. मात्र चारही वेळा त्याच्या पदरी अपयश आले होते. मात्र निराश न होता अभ्यासातील सातत्य त्याने सुरूच ठेवले. भारतीय प्रशासकीय सेवा परीक्षेबरोबर या वर्षी त्याने भारतीय वन सेवा ही परीक्षादेखील दिली. या परीक्षेचा आयोगाने शुक्रवारी सायंकाळी निकाल जाहीर केला. त्यात त्याने देशात २९ वा क्रमांक पटकावला. स्वप्निल हा मूळचा चिराई तालुका बागलाण येथील रहिवासी असून त्याचे वडील मनोहर अहिरे हे मालेगाव येथील के.बी.एच. विद्यालयात शिक्षक तर आई आशाबाई गृहिणी आहे. विशेष म्हणजे कोणतीही शिकवणी न लावता स्वप्निलने घरी राहूनच अभ्यास करत हे यश मिळविले.