नाशिक : त्र्यंबक रस्त्यावरील स्वातंत्र्यवीर सावरकर जलतरण तलावात तीन महिन्यांपासून चाललेल्या तरणतलावाच्या नुतनीकरणाने महिला जलतरणपटुंची अडचण झाली आहे. येथील पुरुषांसाठीचा तरणतलाव त्यांना सकाळी साडेनऊ आणि दुपारी चार याप्रमाणे प्रत्येकी एक तासाच्या सत्रात वापरण्यास मिळतो. परंतु, नोकरदार महिला, महाविद्यालयीन विद्यार्थिंनीसाठी ही वेळ योग्य नसल्याने अनेकींचा सराव बंद झाला. या स्थितीत तातडीने सुधारणा न झाल्यास आगामी काळात होणाऱ्या राज्य व राष्ट्रीय जलतरण स्पर्धेतील नोंदणी रद्द करण्याची वेळ येऊ शकते, असे काही महिला जलतरणपटूंचे म्हणणे आहे.
महिला जलतरण तलाव आणि स्नानगृहाच्या नुतनीकरणाचे काम सध्या प्रगतीपथावर आहे. या तलावात एरवी सकाळपासून सायंकाळपर्यंत महिलांसाठी सत्र असते. १५० ते २०० महिला आपल्या सोयीच्या वेळेनुसार जलतरणासाठी येत असतात. नुतनीकरण कामात कपडे बदलण्याची खोली पाडण्यात आली. तिची अद्याप उभारणी झालेली नाही. तलावावर आच्छादन नसल्याचे काहींनी येणे सोडून दिल्याचे सांगितले जाते. या काळात मनपा प्रशासनाने आकारमानाने मोठ्या असणाऱ्या पुरुषांसाठीच्या तलावात विभागून महिलांसाठी पोहण्याची व्यवस्था केली होती. अनेक वर्षांपासून नियमित सराव करणाऱ्या महिलांना त्याची अडचण नव्हती. परंतु, मध्यंतरी कुणीतरी तक्रार केल्यानंतर मनपा प्रशासनाने वेळेत बदल करुन महिलांसा्ठी दिवसभरात केवळ दोन सत्रांचे फेरनियोजन केले. सकाळी साडेनऊ ते साडेदहा आणि दुपारी चार ते पाच या दोन सत्रात महिलांना तलावाचा वापर करण्यास परवानगी देण्यात आल्याचे प्रशासनाने सूचित केले आहे.
हे ही वाचा… अनुसूचित जमातींमधून आरक्षणासाठी धनगर समाजाचे आंदोलन
महिलांसाठी निश्चित केलेली मर्यादित वेळ त्रासदायक ठरत आहे. नोकरदार वा गृहिणींनाही या सत्रात येणे अशक्य असते. शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनी येऊ शकत नाहीत. सकाळ आणि सायंकाळची वेळ बहुतेकींना सोयीची ठरते. पुढील तीन महिन्यांत राज्य व राष्ट्रीय स्तरावरील जलतरण स्पर्धा होणार आहेत. त्यासाठी अधिकचा सराव आवश्यक असतो. मनपा प्रशासनाने या समस्या तातडीने न सोडविल्यास स्पर्धेतील सहभाग मागे घ्यावा लागू शकतो, याकडे डॉ. सपना नेरे यांनी लक्ष वेधले. मनपाने महिलांची वेळ मर्यादित केल्याच्या विरोधात काही महिलांनी प्रशासनाकडे तक्रारी केल्या. सध्याच्या सत्रात उन्हाचा त्रास होतो. तरण तलावाचा विभागून वापर करताना कुठलाही त्रास झाला नाही, प्रशिक्षक व कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभते, असे एका महिला जलतरणपटूने म्हटले आहे.
हे ही वाचा… पाकिस्तानी अभिनेत्याच्या चित्रपटाविरोधात मनसेचे आंदोलन
महिनाभरात स्वातंत्र्यवीर सावरकर जलतरण तलावातील काम पूर्ण होईल, असे प्रारंभी सांगितले गेले. परंतु, अडीच- तीन महिने उलटूनही हे काम झालेले नाही. या समस्यांवर काम त्वरित पूर्ण करून महिलांसाठीचा तरणतलाव आवश्यक त्या सोयी सुविधांसह खुला करणे हा एकमात्र उपाय आहे. – गायत्री पारख (जलतरणपटू)