शहरातील सागर स्विटस मिठाईच्या दुकानात चोरी करणाऱ्या परराज्यातील संशयिताला स्थानिक गुन्हे शाखा विभाग एकने ताब्यात घेतले आहे. पथकाने चोराकडून २२ लाख, ७० हजार रुपये हस्तगत केले असून गंगापूररोड पोलिसांकडे ही रक्कम सुपूर्द करण्यात आली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

गंगापूर रोड परिसरातील सागर स्विट्स मिठाईच्या दुकानात ३५ लाख रुपयांची चोरी झाली होती. गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. स्थानिक गुन्हे शाखा विभाग एकच्या वतीने वरिष्ठ निरीक्षक विजय ढमाळ आणि गंगापूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक रियाज शेख यांनी दुकानातील कामगार, काम सोडून गेलेले कामगार यांची माहिती जमा करण्यास सुरूवात केली. तसेच परिसरातील बस स्थानक, रिक्षा स्थानक आदी ठिकाणच्या सीसीटीव्ही चित्रीकरणाची तपासणी करण्यात आली. तांत्रिक विश्लेषण आणि माहितीच्या आधारे संशयाची सुई दुकानातील काम सोडून गेलेला उत्तर प्रदेश येथील कामगार विवेककुमार उर्फ अंजनी रामेश्वर प्रसाद याच्यावर रोखली गेली. विवेककुमार आणि त्याच्या साथीदारांनी ही घरफोडी केल्याचे तपासात उघड झाले.

हेही वाचा >>> नाशिक: बेछूट आरोप करणे इतकेच विरोधकांचे काम – श्रीकांत शिंदे यांची टीका

स्थानिक गुन्हे शाखेचेचे पथक संशयिताच्या शोधासाठी उत्तर प्रदेशातील बाराबंकी येथे गेले. अखिलेश कुमार मनिराम (२५, रा. बाराबंकी) याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने साथीदारांच्या मदतीने घरफोडी केल्याची कबुली दिली. विवेककुमार सोबत घरफोडी केल्याचे त्याने सांगितले. पोलिसांनी त्याच्याकडून २२ लाख, ७० हजार रुपये हस्तगत केले. विवेककुमार याला उत्तर प्रदेश पोलिसांनी अवैधरित्या शस्त्र बाळगल्या प्रकरणी अटक केली असल्याने संपूर्ण कायदेशीर प्रक्रिया पार पडल्यावर त्यास हस्तांतरीत करण्यात येणार आहे.

हेही वाचा >>> जळगाव: पारोळ्यानजीक मोटार-टँकर धडकेत डॉक्टरसह अभियंत्याचा मृत्यू

गुन्ह्यातील संशयित परप्रांतीय कामगार आहे. शहर परिसरात बहुतांश खाद्यपदार्थांच्या दुकानात परप्रांतीय कामगार आहेत. या घटनेच्या पार्श्वभूमीवर हॉटेल व्यवसायिक, खाद्य पदार्थ बनविणाऱ्यांनी परप्रांतीय कामगारांची संपूर्ण माहिती जमा करावी, ते जेथील रहिवासी आहेत त्यांच्या स्थानिक पोलीस ठाण्याचे ना हरकत प्रमाणपत्र मिळवा, अशी सूचना करण्यात आल्याची माहिती वरिष्ठ निरीक्षक विजयकुमार ढमाळ यांनी दिली. विवेककुमार हा सागर स्विट्स मध्ये कामाला होता. कामावर असतांना पैसे कुठे ठेवले जातात किंवा अन्य तपशील मिळवला. आपल्या साथीदारांसोबत त्याने घरफोडीची योजना आखली. घरफोडी करण्याआधी क्षुल्लक कारण पुढे करुन त्याने नोकरी सोडली. आठ दिवसातच घरफोडी करत तो साथीदारासह मुद्देमाल घेऊन गावी गेला. मात्र शस्त्र बाळगल्या प्रकरणी त्याला स्थानिक पोलिसांनी अटक केली. सध्या तो कारागृहात आहे.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sweet shop worker arrested for stealing cash zws