लोकसत्ता प्रतिनिधी
नाशिक : पावसाळा संपून दोन महिनेही होत नाही तोच त्र्यंबकेश्वर तालुक्यातील टाकेहर्ष गावाला पिण्याच्या पाण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. ग्रामस्थांकडून १६ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता देवगाव येथील रस्त्यावर वाहतूक अडविण्यासह हंडा मोर्चा काढण्यात येणार आहे. टाकेहर्ष गावातील जनतेला पिण्यासाठी पाणी मिळत नसल्याच्या निषेधार्थ एल्गार कष्टकरी संघटनेने आंदोलनासाठी पुढाकार घेतला आहे.
२०२२-२३ पासून जल जीवन पाणी पुरवठा योजनेचे काम सुरू आहे. यासाठी काही कोटींची आर्थिक तरतूद करण्यात आली असली तरी ते काम अद्याप अपूर्णच आहे. या योजनेचे काम सुरू केल्यावर काही ठिकाणी जुनी जलवाहिनी तोडण्यात आली. त्यामुळे गावाला पाणी पुरवठा होत नाही. त्यामुळे पाण्यासाठी महिलांना वणवण भटकावे लागत आहे.
आणखी वाचा-ईव्हीएमविरोधात धार्मिक संघटनाही मैदानात; जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा
प्रशासनाकडे याबाबत सातत्याने पाठपुरावा करूनही उपाययोजना होत नाहीत. त्यामुळे ग्रामपंचायतीवर मोर्चाही काढण्यात आला होता. तरीही प्रशासन आणि पाणी पुरवठा विभागाने कोणतीच हालचाल केली नाही. आता रास्ता रोको आणि हंडा मोर्चा काढून पंचायत समितीला निवेदन देण्यात येणार आहे.