नाशिक : Talathi Bharti recruitment copy तलाठी भरती परीक्षेवेळी आधुनिक साधनांनी कॉपी पुरविण्याच्या प्रकरणात अटकेत असणाऱ्या संशयिताला येथील न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. संशयित हा चुलत बहिणीला कॉपी पुरवीत असल्याचे उघड झाले. या प्रकरणातील दोघांचा शोध घेण्यासाठी शहर पोलिसांचे पथक औरंगाबादला रवाना झाले आहे. हा पेपर फुटीचा प्रकार नसल्याचा पुनरुच्चार तपास यंत्रणेने केला आहे.
१० लाखहून अधिक अर्ज प्राप्त झाल्यामुळे तलाठी भरती परीक्षा एकाच वेळी न होता टप्प्याटप्प्याने होणार आहे. परीक्षेच्या पहिल्याच दिवशी म्हणजे गुरुवारी म्हसरूळच्या केंद्राबाहेर पोलिसांनी संशयास्पदरित्या फिरणाऱ्या गणेश गुसिंगे (संजारपूरवाडी, वैजापूर, औरंगाबाद) याला ताब्यात घेतले होते. या घटनाक्रमाने पेपर फुटल्याची चर्चा झाली असली तरी तसा हा प्रकार नसल्याचे तपास यंत्रणेचे स्पष्ट केले होते. प्राथमिक चौकशीत संशयिताकडून परीक्षा देणारी चुलत बहीण संगीता गुसिंगे (२१) हिला कॉपी पुरवली गेल्याचे उघड झाले. गणेश, त्याचा साथीदार सचिन नायमाने आणि संगीता गुसिंगे यांच्या विरुद्ध म्हसरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.