सातबारा उतार्यावर नाव लावण्यासाठी चार हजारांची लाच घेताना खिरोदा (ता. रावेर) येथील तलाठ्यासह कोतवालाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने गुरुवारी अटक केली. प्रमोद न्हायदे (४५, रा. गणेश कॉलनी, फैजपूर, यावल) असे तलाठ्याचे, तर शांताराम कोळी (५२) असे अटक केलेल्या लाचखोर कोतवालाचे नाव आहे. तक्रारदारांची वडिलोपार्जित शेती खिरोदा येथील तलाठी कार्यालयाच्या हद्दीत आहे.
हेही वाचा >>> जळगावात रस्ते काँक्रिटीकरणासाठी शंभर कोटींचा निधी मंजूर
तक्रारदारांच्या मोठ्या भावाचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे शेतजमिनीच्या सातबारा उतार्यावर मृत भावाची पत्नी आणि मुलाचे नाव वारस म्हणून नोंदविण्याच्या मोबदल्यात चार हजारांची लाच तलाठी न्हायदे आणि कोतवाल कोळी यांनी मागितली. तक्रारदारांनी जळगावच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्याअनुषंगाने पोलीस उपअधीक्षक शशिकांत पाटील यांच्या नेतृत्वात निरीक्षक संजोग बच्छाव, ईश्वर धनगर, राकेश दुसाने आदींच्या पथकाने खिरोदा येथील तलाठी कार्यालयात सापळा रचला. पथकाने तक्रारदाराकडून तलाठी न्हायदे व कोतवाल कोळी यांना लाचेचे चार हजार रुपये स्वीकारताना रंगेहात पकडले. याप्रकरणी सावदा येथील पोलीस ठाण्यात तलाठी न्हायदे व कोतवाल कोळी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.