नाशिक : मुंबई-आग्रा महामार्गावरील आडगाव शिवारात रस्त्यात उभ्या असलेल्या कंटेनरला इंधन टँकर धडकल्याने झालेल्या अपघातात गंभीर जखमी झालेल्या टँकर चालकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. भुपेश मगर (२७, झोडगे, मालेगाव) असे अपघातात मयत झालेल्या टँकर चालकाचे नाव आहे. शुक्रवारी रात्री साडेअकरा वाजता आडगाव शिवारातील नऊवा मैल परिसरात हा अपघात झाला होता. मगर हे इंधन टँकर घेऊन मालेगावहून मुंबईच्या दिशेने निघाले होते.
गरवारे पेट्रोल पंप भागात रस्त्यावर उभ्या असलेल्या कंटेनरला इंधन टँकरने धडक दिली. टँकरचा पुढील भाग चेपल्याने त्यांना गंभीर दुखापत झाली होती. स्थानिक नागरिकांनी त्यांना प्रथम एका खासगी रुग्णालयात प्रथमोपचार करून नंतर आडगावच्या वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात दाखल केले होते. उपचार सुरू असताना मगर यांचे निधन झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. या प्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.