मनमाड – नव्या कायद्याच्या विरोधात टँकर चालकांनी पुकारलेल्या संपामुळे ठप्प झालेले उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील इंधन वितरण मंगळवारी जिल्हाधिकारी जलज शर्मा आणि पोलीस अधीक्षक शहाजी उमाप यांच्या यशस्वी मध्यस्थीमुळे ३१ तासानंतर पूर्ववत होण्यास हातभार लागला. वाहतूकदारांनी संप मागे घेऊन वाहतूक सुरळीत करण्याचे मान्य केले. दुपारनंतर तेल कंपन्यांमधून पोलीस बंदोबस्तात टँकरची वाहतूक सुरु झाली. यामुळे राज्यांतील सर्वच प्रमुख जिल्ह्यांत रात्री उशिरापर्यंत किंवा पहाटेपर्यंत पेट्रोल व डिझेल पोहचू शकेल. येत्या २४ तासात राज्यातील विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र तसेच उर्वरीत १६ जिल्ह्यांतील इंधन पुरवठा सुरळीत होईल, असे जिल्हाधिकारी शर्मा यांनी म्हटले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> …म्हणजे आम्ही महाविकास आघाडीचे बारा वाजवायला मोकळे, रामदास आठवले यांचा टोला

टँकर चालकांच्या संपामुळे सलग दुसऱ्या दिवशी सकाळी पानेवाडीस्थित इंडियन ऑइल, भारत पेट्रोलियम, एचपीसीएल, आयओसी या चार प्रमुख इंधन कंपन्यांमधून इंधन पुरवठा होऊ शकला नव्हता. या प्रकल्पांतून नाशिक, उत्तर महाराष्ट्र व मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यात इंधन व घरगुती गॅसचे वितरण केले जाते. सुमारे १३०० टँकर हे काम करतात. ही सर्व वाहतूक बंद राहिली. वाहतूकदारांनी वितरक अर्थात पंपचालकांचे टँकर भरण्यास विरोध केला. परिणामी, इंधन वितरणाचे काम पूर्णपणे थंडावले. सर्वत्र अभुतपूर्व इंधन टंचाईला तोंड द्यावे लागले. परिस्थितीचे गांभिर्य लक्षात घेऊन जिल्हाधिकारी जलज शर्मा, पोलीस अधीक्षक शहाजी उपाम यांनी सकाळीच मनमाडकडे धाव घेतली. संप सुरू असलेल्या प्रकल्पात भेट देत इंधन कंपन्यांचे अधिकारी, संपकरी चालक व वाहतूकदारांशी स्वतंत्रपणे चर्चा केली.

हेही वाचा >>> आश्रमशाळेतील सहा विद्यार्थिनींना अन्नातून विषबाधा

हिंदुस्तान पेट्रोलियमचे विभागीय अधिकारी सशांक दभाणे, प्रकल्प अधिकारी बी. पी. मिना, आयओसीचे प्रादेशिक व्यवस्थापक धिरजकुमार, भारत पेट्रोलियमचे प्रबंधक प्रशांत खर्गे, इंडियन ऑईलचे प्रबंधक आनंद बर्मन, तहसीलदार सिध्दार्थ मोरे, पोलीस उपअधीक्षक सोहेल शेख, निरीक्षक बाळासाहेब थोरात, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद जाधव आदींसह वाहतूकदार व चालक यांचे प्रतिनिधी आदींबरोबर सुमारे दीड तास संयुक्त चर्चा झाली. त्यानंतर संप मागे घेण्यात आला. जिल्हाधिकारी येण्यापूर्वी २४ तासात प्रशासन, तेल कंपन्यांचे अधिकारी व संपकर्यांच्या झालेल्या तीन बैठका निष्फळ ठरल्या होत्या. जिल्हाधिकारी जलज शर्मा यांच्या आवाहनास टँकरचालकांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याने संप मागे घेण्याचा मार्ग मोकळा झाला. दुपारी तीननंतर भारत पेट्रोलिमय, इंडियन ऑईल, हिंदुस्तान पेट्रोलियम व गॅस प्रकल्पातील सर्व टँकर्स भरून वाहतूक टप्याटप्प्याने बंदोबस्तात पानेवाडी व नागापूर येथून सुरू झाली.

चर्चासत्राद्वारे चालकांना मार्गदर्शन

चालकांच्या दंडसंहितेबाबतच्या भावना केंद्र शासनाला कळविण्यात येतील. चालकांवर अन्याय होणार नाही. गैरसमज चर्चासत्र घेऊन मार्गदर्शन करीत दूर केला जाईल. कायद्याचा नेमका अर्थ चालक, वाहतूकदारांना समजावून सांगितला जाईल. इतर मागण्या व अडचणींबाबत केंद्राकडे पाठपुरावा केला जाईल, असे आश्वासन जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी आंदोलकांना दिले.

टँकरला विशेष बंदोबस्त

संप मागे घेतल्यानंतर विविध जिल्ह्यांत इंधन घेऊन जाणाऱ्या टँकरला विशेष पोलीस संरक्षण दिले जाईल. रस्त्यामध्ये कोणताही गैरप्रकार होणार नाही याची दक्षता प्रशासन घेईल. नागरिकांनीही सहकार्य करावे. – शहाजी उमाप (जिल्हा पोलीस अधीक्षक, नाशिक)

राज्यांतील जनतेने इंधनबाबत धास्ती बाळगू नये. डिझेल-पेट्रोल पुरवठ्याबाबत २४ तासात परिस्थिती पूर्ववत होईल. त्यामुळे इंधनाचा साठा किंवा टाक्या भरून घेण्याची आवश्यकता नाही. नागरिकांनी यापुढे संयम बाळगत कोठेही घाईगर्दी करू नये, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tanker operators in nashik call off their strike zws