नाशिक : त्र्यंबकेश्वर तालुक्यातील टाकेहर्ष ग्रामपंचायत क्षेत्रात जलस्वराज्य योजनेची नळ पाणी पुरवठा योजना दोन वर्षापासून बंद आहे. देयक न भरल्याने वीज कंपनीने योजनेची वीज जोडणी खंडित केली असून तेव्हापासून योजना बंद आहे. त्यामुळे २०२३ पासून गावात पिण्याच्या पाण्याची समस्या गंभीर आहे. या विषयाकडे लक्ष वेधण्यासाठी एल्गार कष्टकरी संघटनेच्या वतीने सोमवारी देवगाव रस्त्यावर रिकामे हंडे घेत रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
२०२२-२३ पासून जलजीवन पाणी पुरवठा योजनेचे काम सुरू आहे. यासाठी कोट्यवर्ध रुपयांची आर्थिक तरतूद करण्यात आली असतानाही काम अद्यापही अपूर्ण आहे. या योजनेचे काम सुरू करण्याआधीपासून गावात जलस्वराज्यची पाणी पुरवठा योजना होती. परंतु, वीज देयक थकल्याने वीज जोडणी खंडित करण्यात आल्यापासून जुनी योजना बंद आहे. गावाला वर्षभरापासून पिण्यासाठी पाणी मिळत नाही. जलजीवन योजनेचे काम २०२३ मध्ये काहीअंशी पूर्ण झाले होते. अर्धवट काम केल्यामुळे पाण्यासाठी महिलांना हंडाभर पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. पिण्यासाठी पाणी मिळत नाही.
हेही वाचा…छगन भुजबळ यांना डावलल्याने समर्थक संतप्त, अजित पवारांविरोधात घोषणाबाजी, रास्ता रोको, टायर जाळले
ह
ग्रामपंचायत प्रशासन आणि पाणी पुरवठा विभाग कोणतीही दखल घेत नसल्याने एल्गार कष्टकरी संघटनेच्या वतीने त्र्यंबक- देवगाव रस्त्यावर आंदोलन करण्यात आले. टाकेहर्ष येथील शेकडो महिला रिकामे हंडे घेऊन रस्त्यावर चार तास बसून होत्या. आंदोलनमुळे प्रशासनाची चांगलीच तारांबळ उडाली. तहसीलदार आणि पाणी पुरवठा अधिकारी यांच्या आश्वासनानंतर चार तासांनी आंदोलन मागे घेण्यात आले.