लोकसत्ता प्रतिनिधी
नाशिक : महाराष्ट्र राज्य आदिवासी विकास महामंडळमार्फत आधारभूत किंमत योजनेंतर्गत आदिवासी क्षेत्रात यंदाच्या मोसमात ३३ लाख क्विंटल धान खरेदीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. धान खरेदीला सुरुवात करण्यात आली असून शेतकऱ्यांनी एनईएमएल पोर्टलवर आपल्या नजिकचे धान खरेदी केंद्र निवडून नोंदणी करावी, असे आवाहन आदिवासी विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक लीना बनसोड यांनी केले आहे.
राज्यातील आदिवासी भागातील शेतकऱ्यांनी पिकविलेल्या धानाची आदिवासी विकास महामंडळाकडून किमान आधारभूत किंमतीत खरेदी केली जाते. २०२४-२५ या वर्षासाठी केंद्र शासनाने २३०० रुपये प्रतिक्विंटल असा दर निश्चित केला आहे. गेल्या वर्षी २१८३ रुपये प्रति क्विंटल असा दर होता. महामंडळामार्फत राज्यातील सहा केंद्रांमध्ये धान खरेदी केली जाणार असून यामध्ये गडचिरोली, गोंदिया, चंद्रपूर, पालघर, ठाणे, रायगड, नाशिक, पुणे, अहिल्यानगर या जिल्ह्यांचा समावेश आहे.
आणखी वाचा-लाडकी बहीण योजनेच्या अर्ज छाननीत तीन टक्के त्रुटींचा संभव; नाशिक विभागातील स्थिती
धान खरेदीत पारदर्शकता येण्यासाठी यंदाच्या मोसमात महामंडळाचे अधिकारी, कर्मचारी यांनी थेट बांधावर जाऊन पडताळणी केली आहे. यामध्ये प्रादेशिक अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष क्षेत्र व लागवडीखालील क्षेत्र, याची पाहणी करून शेतकऱ्यांचे समुपदेशन करत ई पीक पाहणी करण्यास शेतकर्यांना मदत केली आहे.