नाशिकमध्ये ‘जागतिक शौचालय दिन’ सर्व शाळांमध्ये उत्साहात साजरा करण्याची जय्यत तयारी सुरू आहे. त्या अंतर्गत शालेय विद्यार्थ्यांसाठी आयोजित विविध स्पर्धांमध्ये ‘शौचालयासह सेल्फी’ हा ऑनलाईन उपक्रम राबवण्यात येणार आहे. त्यामध्ये स्वच्छ आणि आरोग्यदायी शौचालयासह सेल्फी काढणे, असा विषय देण्यात आला आहे. ऑनलाईन स्पर्धेतील हा विषय बघून शिक्षकही अवाक झाले आहेत.
शाळा आणि महाविद्यालयीन स्तरावर सध्या शासकीय परिपत्रकांनुसार विविध दिवस साजरे केले जात आहेत. त्यात आता १९ नोव्हेंबर या ‘जागतिक शौचालय दिन’ उपक्रमाची भर पडली आहे. हा दिवस सर्व शाळांमध्ये साजरा करण्याबाबत जिल्हा परिषद शिक्षण विभागाने परिपत्रक काढले आहे. या दिनाचे औचित्य साधून ‘युनिसेफ’ आणि ‘सीवायडीए’ (पुणे) यांच्या वतीने राज्यस्तरीय स्वच्छ शौचालय अभियान राबवले जात आहे. इयत्ता चौथी ते १० वीपर्यंतच्या मुला-मुलींसाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. या सर्व स्पर्धा ऑनलाईन पध्दतीने पार पडणार आहेत. स्पर्धेचा निकाल शौचालय दिनी जाहीर केला जाणार आहे.
‘शौचालयासह सेल्फी’ या स्पर्धेवर शिक्षकांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. शिक्षकांवर अतिरिक्त कामांचा ताण आहे. त्यामुळे ज्ञानदानावर परिणाम होत आहे. आता त्यांना सफाई कामगार करण्याचा प्रयत्न होत असल्याचा सूर उमटत आहे. शिक्षकांची शौचालयं स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी आहे की, शाळेत शिकविण्याची? हा प्रश्न उपस्थित करत अनेक शिक्षकांनी पत्रकाचा निषेध केला आहे. या स्पर्धांमध्ये सर्व माध्यमातील शालेय विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे, यासाठी शिक्षणाधिकारी (प्राथमिक) बी. डी. कनोज यांनी गटशिक्षणाधिकारी आणि प्रशासन अधिकाऱ्यांना (मनपा) पत्र पाठवले आहे. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी ८०१०२ ८८९२४ क्रमांक अथवा उपलब्ध केलेल्या लिंकचा वापर करण्यास सांगण्यात आले आहे.
उपक्रमाअंतर्गत सलग चार दिवस या स्पर्धा पार पडत आहेत. १५ नोव्हेंबरला पथनाट्य स्पर्धेने (शाळा व गाव पातळीवर) या उपक्रमाची सुरूवात झाली आहे. त्यासाठी ‘माझी शाळा, माझे शौचालय’ आणि ‘शौचालय वापरण्याच्या योग्य पध्दती व मलमूत्र व्यवस्थापन’ हे विषय देण्यात आले होते. १६ नोव्हेंबरला ‘माझी शाळा, माझे सुरक्षित शौचालय’, ‘शौचालय वापरण्याच्या योग्य व आरोग्यदायी पध्दती’ आणि ‘माझ्या स्वप्नातील शौचालय’ यावर चित्रकला स्पर्धा होणार आहे. तर १७ नोव्हेंबरला ‘शौचालयासह सेल्फी’ हा विषय देण्यात आला आहे. या विषयावर शिक्षकांसाठी घोषवाक्य स्पर्धादेखील आयोजित करण्यात आली आहे.