लोकसत्ता प्रतिनिधी
नाशिक: नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ.बी.जी.शेखर यांच्या पथकाने धुळे तालुक्यातील मोराणे शिवारातील महेंद्र हॉटेलच्या पाठीमागे जुगार अड्ड्यावर छापा टाकला. या छाप्यात एक लाख ५० हजाराची रोख रक्कम तसेच ३१ जणांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडील २५ मोटार सायकली आणि तीन चारचाकी वाहने या पथकाने जप्त केले.
आणखी वाचा-जळगाव जिल्ह्यात नऊ महिन्यांत २३ गुन्हेगार स्थानबद्ध
गेल्या आठवड्यात ठाणे पोलिसांनी आणि नाशिक परिक्षेत्राच्या विशेष महानिरीक्षकांनी जिल्ह्यात नुकत्याच केलेल्या कारवायांमुळे धुळे जिल्हा पोलिसांच्या प्रतिमेला छेद गेला आहे. बनावट दारूचे कारखाने, गुटख्याची वाहतूक, अग्निशस्र बनविणारे आणि विकणाऱ्यांचा सुळसुळाट हे प्रकार आता जिल्हावासीयांसाठी नवीन राहिलेले नाहीत. अवैध धंद्यांकडे प्रमुख पोलीस अधिकारी आणि कर्मचारी लक्षच देत नसल्याने दिवसागणिक असे अप्रिय धंदे वाढीस लागले असल्याची तक्रार आहे. मुंबई-आग्रा आणि नागपूर-सुरत या दोन महामार्गासोबतच धुळे-सोलापूर हा तिसरा महामार्ग गुन्हेगारांच्या दृष्टीने सोयीचा मार्ग ठरल्याने या महामार्गावरील लहान-मोठ्या गावांमध्ये अवैध धंद्यांचे बस्तान बसविण्याचे प्रयत्न नेहमीच केले जातात. विशेष पोलीस महानिरीक्षक यांच्या पथकाने केलेली कारवाईही अशाच महामार्गालगतच्या एका हॉटेलमागे झाली आहे.