राष्ट्रीय कुटुंब कल्याण व आरोग्य विभागाचे सर्वेक्षण
बदलती जीवनशैली, समाज माध्यमांचे तरूणाईवर असणारे गारूड, लैंगिक शिक्षणाचा अभाव, भिन्नलिंगी आकर्षण यासह अन्य काही कारणांमुळे कुमारी माता होण्याचे प्रमाण वाढल्याचे समोर आले आहे. महत्वाची बाब म्हणजे, शहरी भागाच्या तुलनेत ग्रामीण भागात हे प्रमाण अधिक असल्याचे राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणात अधोरेखीत झाले आहे.
केंद्र सरकार दर १० वर्षांनी लोकसंख्या, आरोग्य आणि कुपोषण या विषयांवर सर्वेक्षणाद्वारे सद्यस्थिती जाणून घेण्याचा प्रयत्न करते. आरोग्य व कुटुंब कल्याण विभागाने मुंबईच्या इंटरनॅशनल इन्स्टिटय़ूट फॉर पॉप्युलेशन सायन्स संस्थेच्या सहकार्याने हे सर्वेक्षण केले. या माध्यमातून प्रत्येक राज्यातील आरोग्य आणि त्याच्याशी संबंधित विविध पैलूंचा अभ्यास करतांना संसर्गजन्य, साथींचे आजार, स्थलांतरांमुळे एचआयव्ही, गर्भपात, गर्भारपणात होणारे आजार यासह अन्य काही गंभीर विषयांकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न झाला.
यंदा प्रथमच जिल्हा तसेच केंद्र स्तरावर विविध मुद्यांचा सर्वेक्षणात समावेश करत वैयक्तीक स्तरावर लिंगपरत्वे वर्तणूक, पतीच्या कामाची पाश्र्वभूमी, पत्नीचे सद्यस्थितीतील काम, एचआयव्ही-एड्सबाबत माहिती, घरगुती हिंसाचार आदींचाही अंतर्भाव करण्यात आला. या सर्वेक्षणात राज्यातील १५ ते १९ वयोगटातील महिलांच्या अभ्यासात अनेक धक्कादायक बाबी पुढे आल्या. कुमारी गटाचे सर्वेक्षण सुरू असतांना काही मुली माता, तर काही काही गर्भवती असल्याचे निदर्शनास
आले.
आकडेवारीच्या भाषेत सांगायचे तर शहरात हे प्रमाण ६.० टक्के, तर ग्रामीण भागात १०.४ टक्के इतके असून एकूण सरासरी ८.३ टक्के आहे. गेल्या सर्वेक्षणाच्या तुलनेत हे प्रमाण ५.५ टक्क्यांनी कमी झाले आहे. साधारणत १५ ते १९ हा वयोगट शालेय व महाविद्यालयात शिक्षण घेणारा असतो. त्यात कुमारी अवस्थेत गर्भवती किंवा माता होण्याचे प्रमाण चिंताजनक आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा