लोकसत्ता विशेष प्रतिनिधी
नाशिक: तालुक्यातील राजूर बहुला येथील जमीन उत्खनन प्रकरणात पाचपट दंड आकारणीच्या फेरचौकशीवेळी १५ लाखांची लाच स्वीकारताना पकडला गेलेला नाशिकचा तहसीलदार नरेशकुमार बहिरम यास विशेष न्यायालयाने आठ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. बहिरमच्या घरातून चार लाख ८० हजार रुपयांची रोकड, ४० तोळे सोने व १५ तोळे चांदी असे घबाड हाती लागले आहे. रविवारी बँक व अन्य आस्थापनांना सुट्टी असल्याने बहिरमची अन्य संपत्ती तसेच मालमत्तांचा शोध घेण्यास तपास यंत्रणेला मर्यादा आली. महत्वाची बाब म्हणजे महसूल सप्ताह साजरा केला जात असताना झालेल्या या कारवाईने महसूल विभागाचा कारभार चव्हाट्यावर आला आहे.
राजूर बहुला येथील जमिनीत मुरुम उत्खननाबाबत मूल्य नियमानुसार पाचपट दंड, स्वामित्व धन जागा भाडे मिळून एकूण १,२५,०६,२२० रुपये दंड आकारणी जमीन मालकास करण्यासंदर्भात नाशिक तहसीलदार कार्यालयाकडील आदेश आले होते. त्या आदेशाविरुद्ध जमीन मालकांनी नाशिकच्या उपविभागीय अधिकाऱ्याकडे अपील दाखल केले होते. त्याबाबत आदेश झाल्यानंतर हे प्रकरण फेर चौकशीसाठी तहसीलदार नरेशकुमार बहिरम (४४, मेरिडियन गोल्ड, कर्मयोगी नगर, नाशिक) याच्याकडे पाठविण्यात आले होते. या जमिनीतील उत्खनन केलेल्या मुरूमचा त्याच जागेत वापर झाल्याचे मालकांनी त्यांच्या कथनात नमूद केले होते. त्या संदर्भात पडताळणी करण्यासाठी तहसीलदार बहिरमने जमिनीच्या मालकांना स्थळ निरीक्षणवेळी राजूर बहुला येथे बोलावले होते. परंतु, जमिनीच्या मालक वयोवृद्ध व आजारी असल्याने त्यांनी तक्रारदारास त्यांच्या वतीने कायदेशीर कारवाईसाठी अधिकार पत्र दिल्याने ते स्थळनिरीक्षणवेळी तहसीलदार बहिरम यास भेटले. त्यावेळी बहिरमने तक्रारदाराकडे तडजोडीअंती १५ लाख रुपये लाचेची मागणी केली होती. लाचेची रक्कम शनिवारी बहिरमने कर्मयोगी नगरमधील राहत्या घराच्या इमारतीतील वाहनतळात स्वीकारली. यावेळी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने त्यास पकडले. बहिरमविरुध्द भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
आणखी वाचा-जळगाव: अमळनेर-चोपडा रस्त्यावर कठडे तोडत मोटार पुलाखाली
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लगोलग बहिरमच्या बेहिशेबी मालमत्तेचा शोध सुरू केला. मेरिडियन गोल्ड इमारतीतील त्याच्या घराची छाननी करण्यात आली. यावेळी चार लाख ८० हजार रुपयांची रोख रक्कम, ४० तोळे सोने व १५ तोळे सोने आढळून आल्याचे पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा घारगे-वालावलकर यांनी सांगितले. रविवारी शासकीय सुट्टी असल्याने बहिरमच्या अन्य संपत्तीचा शोध घेण्यास काहिशी मर्यादा आली. बहिरमची बँक खाती, त्यातील रक्कम, स्थावर मालमत्ता आदींची स्पष्टता अद्याप होणे बाकी आहे. बहिरमला विशेष न्यायालयासमोर हजर करण्यात आले. न्यायालयाने आठ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावल्याची माहिती सूत्रांनी दिली.
लाखोंची उड्डाणे
एक ऑगस्टपासून जिल्ह्यात महसूल सप्ताहाला उत्साहात सुरूवात झाली. या विभागामार्फत नागरिकांना सध्या १३२ योजनांचा लाभ दिला जात असून शासकीय योजनांच्या अमलबजावणीत नाशिक महसूल विभाग आघाडीवर असल्याचे सप्ताहाच्या उद्घाटनप्रसंगी अभिमानाने सांगितले गेले होते. याच सप्ताहात महसूलचा अधिकारी तब्बल १५ लाखांची लाच घेताना पकडला गेला. गेल्या जूनमध्ये अकृषिक परवानगी न घेतल्याने बंद केलेली कंपनी पुन्हा सुरू करण्यासाठी ५० लाखांची लाच मागून तडजोडीअंती ४० लाखांची लाच स्वीकारण्याची तयारी दर्शविल्याच्या प्रकरणात दिंडोरीचे उपविभागीय अधिकारी डॉ. नीलेश अपार यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला होता.
आणखी वाचा- नाशिक: उच्च शिक्षितांचा पोलीस उपनिरीक्षक पदाकडे ओढा
लाचखोरीत महसूल विभाग आघाडीवर असल्याचे सापळा कारवाईच्या आकडेवारीवरून स्पष्ट होते. महसूल विभागाच्या अखत्यारीत जमिनीशी संबंधित कामकाज चालते. सातबाऱ्यावर नाव लावणे असो वा वडिलोपार्जित शेतजमिनीची खातेफोड असो कुठलेही काम लक्ष्मीदर्शनाशिवाय होत नसल्याच्या तक्रारी नेहमी होतात. त्याची प्रचिती या कारवाईतून येत आहे.