दोन दिवसांत तापमानात ७.१ अंशांनी वाढ
दोन दिवसांपूर्वी हंगामातील सर्वात कमी तापमानाची नोंद करणाऱ्या नाशिकमध्ये शुक्रवारी थंडी अंतर्धान पावली. त्यामुळे हुडहुडीचा आनंद घेऊ इच्छिणाऱ्यांचा हिरमोड झाला. अवघ्या दोन दिवसांत तापमानात ७.१ अंशाने वाढ होऊन ते १७.५ अंशांवर पोहोचले. वातावरणाचा नूर अचानक पालटण्यामागे ढगाळ वातावरण हे एकमेव कारण आहे. अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्टय़ामुळे ही स्थिती निर्माण झाली असून आकाश निरभ्र होईपर्यंत दडी मारणाऱ्या थंडीची प्रतीक्षा करावी लागणार आहे.
दोन ते तीन आठवडय़ांपासून गारव्याची अनुभूती घेणाऱ्या नाशिकची डिसेंबरच्या सुरुवातीला कडाक्याच्या थंडीच्या दिशेने वाटचाल सुरू झाली होती. कमी होणाऱ्या तापमानाने बुधवारी हंगामातील नीचांकी म्हणजे १०.४ अंशाची नोंद झाली. गारठून टाकणाऱ्या थंडीने सर्वसामान्यांना चांगलीच हुडहुडी भरण्यास सुरुवात होत असताना ढगाळ वातावरणाने तापमान कमी होण्याची श्रृंखला खंडित झाली आहे. यंदाच्या कडक उन्हाळ्यानंतर पावसाचे आगमन काहीसे विलंबाने झाले. उशिरा आलेला पाऊस अखेरच्या सुमारास तितकासा बरसला नाही. यामुळे थंडीचा हंगाम कसा राहणार याबद्दल सर्वाना उत्सुकता होती. दिवाळीनंतर हवेत गारवा जाणवू लागला, पण तापमान १५ ते २० अंशांच्या दरम्यान राहिले होते. थंडीला खरी सुरुवात झाली, ती डिसेंबरच्या प्रारंभी. गारव्याने आपले अस्तित्व ठळकपणे दाखवण्यास सुरुवात केली आणि चार ते पाच दिवसांत वातावरण गारठले. २ डिसेंबर रोजी १७ अंशावर असणारे तापमान ९ डिसेंबर रोजी १०.४ अंशापर्यंत खाली उतरले. वातावरण थंडगार झाले असताना नाशिक शहर व परिसर धुक्यांच्या दुलईत लपेटला गेला.
प्रत्येक हंगामात नाशिकमध्ये किमान दोन ते तीन वेळा थंडीची लाट येत असते. त्या वेळी सलग तीन ते चार दिवस ही लाट मुक्काम ठोकते, असा आजवरचा अनुभव आहे. उत्तरेकडील वाऱ्याचा प्रभाव नाशिकसह उत्तर महाराष्ट्राच्या वातावरणावर पडतो. यंदा हंगामातील नीचांकी तापमान नोंदले गेल्यावर ते आणखी किती खाली जाईल, याबद्दल सर्वाना उत्सुकता असताना अकस्मात वातावरण बदलल्याने सर्वाचा भ्रमनिरास झाला. गुरुवारपासून या बदलास सुरुवात झाली.सकाळी किमान १२.९ अंशाची नोंद झाली. शुक्रवारी बहुतांश जिल्ह्य़ात ढगाळ वातावरण असल्याने तापमान आणखी वाढून ते १७.५ अंशावर गेल्याची माहिती हवामानशास्त्र विभागाने दिली. अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. यामुळे हवामानशास्त्र विभागाने राज्यातील काही भागांत पावसाच्या तुरळक सरी कोसळण्याचा अंदाज व्यक्त केला. ढगाळ वातावरणाने थंडी गायब झाली असून आकाश निरभ्र होईपर्यंत तिचे अस्तित्व जाणवणे अवघड बनले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा