नाशिक : आठवडाभरापासून कमी होणाऱ्या तापमानाने मंगळवारी हंगामातील १०.८ अंश ही नीचांकी पातळी गाठली. तर निफाडच्या कृषी विज्ञान केंद्रात ८.८ अंश तापमानाची नोंद झाली. नोव्हेंबरच्या अखेरीस तापमान या पातळीवर आल्याने सर्वत्र सुखद गारव्याची अनुभूती मिळत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

टळटळीत उन्हाळा, मुसळधार पावसानंतर नाशिकची वाटचाल आता वेगाने कडाक्याच्या थंडीच्या दिशेने सुरू झाली आहे. एरवी दिवाळीनंतर वातावरणात गारवा जाणवू लागतो. तशी सुरुवात यंदाही झाली होती. नोव्हेंबरच्या मध्यावर तापमान १६.६ अंशावर होते. ११ दिवसांत तापमान ५.८ अंशाने खाली आले आहे. मागील आठवड्यात गुरुवार आणि शुक्रवार असे सलग दोन दिवस तापमान १२.४ अंशावर होते. सोमवारची सकाळ नाशिकला थंड करणारी ठरली. या दिवशी शहरात १२ अंश तर, निफाडमध्ये १० अंश तापमानाची नोंद झाली होती. मंगळवारी ते आणखी खाली आले. नाशिक शहरात १०. ८ तर निफाडमध्ये ८.८ अंश तापमानाची नोंद झाल्याचे हवामानशास्त्र विभागाने म्हटले आहे. या हंगामातील हे नीचांकी तापमान आहे. शहर आणि ग्रामीण भागात कमालीचा गारवा जाणवत आहे. गारठ्यामुळे उबदार कपडे बाहेर पडू लागले आहेत. ग्रामीण भागात थंडीची तीव्रता अधिक जाणवते.

हेही ही वाचा…नंदुरबार जिल्ह्यात बस उलटल्याने तीन प्रवासी गंभीर जखमी

थंड हवेचे ठिकाण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नाशिकमध्ये थंडी काही नवीन नाही. उलट दरवर्षी तिची प्रतिक्षा असते. ही प्रतिक्षा संपुष्टात आली असून या हंगामात अधिक काळ गारव्याची अनुभूती मिळण्याची चिन्हे आहेत. उत्तरेकडील शीतलहरींचा प्रभाव नाशिकच्या वातावरणावर पडतो. तिकडे वातावरणात जसे बदल होतात, तसे नाशिकचे तापमान बदलू लागते. मागील काही हंगामातील नोंदी पाहिल्यावर डिसेंबर, जानेवारीत कडाक्याची थंडी असते. याच काळात तापमान नीचांकी पातळी गाठते. त्या दिशेने नोव्हेंबरच्या अखेरीस वाटचाल सुरू झाल्याचे दिसत आहे.

हेही ही वाचा…नाशिक : सोमेश्वरजवळील अपघातात ज्येष्ठ दाम्पत्याचा मृत्यू

द्राक्ष बागायतदार सतर्क

थंडीमुळे द्राक्ष बागायतदार सतर्क झाले असून थंडीचा कडाका वाढल्यास बागांचे थंडीपासून संरक्षण करण्यासाठी त्यांना उपाययोजना करणे भाग पडणार आहे. हिवाळ्यात जिल्ह्यामध्ये कायमच थंडी जाणवत असते. नाशिक, निफाड आणि मालेगाव या ठिकाणी तापमान घसरत असते. यंदा हिवाळ्याला सुरुवात होत असतानाच तापमान घसरल्याने यापुढे थंडीत अधिक वाढ होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Temperature has dropping for week touched seasons low of 10 8 degrees on tuesday sud 02