धुळ्यात ६.८ तर नाशिकमध्ये ८.५ अंश तापमान

महिन्यापासून गारव्याची अनुभूती घेणाऱ्या नाशिकसह उत्तर महाराष्ट्रास कडाक्याच्या थंडीने गारठून टाकले आहे. या थंडीने सर्वाना चांगलीच हुडहुडी भरली असून दिवसाही गारवा राहत आहे. त्याचा परिणाम द्राक्ष बागांवर होणार असल्याने उत्पादक धास्तावले आहेत. सोमवारी धुळ्यात राज्यातील सर्वात कमी ६.८ अंशाची नोंद झाली. नाशिकमध्ये ८.५ अंश हा हंगामातील नवीन नीचांक गाठला गेला.

नाशिकसह धुळे, जळगाव, नंदुरबारमध्ये पाच ते सहा दिवसांपासून वातावरणाचा हा नूर कायम आहे. दहा अंशाच्या आसपास रेंगाळणारे तापमान सोमवारी नीचांकी पातळी गाठणारे ठरले. संपूर्ण उत्तर महाराष्ट्रात थंडीचा कडाका जाणवत आहे. डिसेंबरमध्ये थंडीने आपले अस्तित्व दाखवायला सुरुवात केली. रविवारी रात्रीपासून वातावरणात कमालीचा गारवा होता. सोमवारी सकाळी नाशिक, धुळे, जळगावमध्ये पारा एकदम घसरला. ११ डिसेंबर रोजी नाशिकमध्ये ९.४ या नीचाकी तापमानाची नोंद झाली होती. पुढील तीन-चार दिवस तापमान १० अंशाच्या आसपास रेंगाळले. सोमवारी सकाळी ८.५ या हंगामातील नवीन नीचाकांची नोंद झाली. धुळ्यातही त्याची पुनरावृत्ती झाली. या ठिकाणी ६.०८ अंश तापमान नोंदले गेले. राज्यातील हे सर्वात कमी तापमान असू शकते.

सातपुडा पर्वतराजीत वसलेल्या नंदुरबारसह जळगावमध्ये गारवा पसरला आहे. उत्तर भारतात बर्फवृष्टी, थंडीची लाट असल्याने त्या भागातून वाहत येणाऱ्या वाऱ्याचा प्रभाव उत्तर महाराष्ट्रातील वातावरणावर पडला आहे.

उत्तर महाराष्ट्रात मुक्काम ठोकणारी थंडीची लाट पुढील काही दिवस कायम राहणार असून या दरम्यान तापमान आणखी खाली जाण्याचा संभव असल्याचे हवामानशास्त्र विभागाने म्हटले आहे. काही वर्षांतील नीचांकी पातळीवर नजर टाकल्यास उत्तर महाराष्ट्रात तापमानाची खरी घसरण ही प्रामुख्याने जानेवारी अथवा फेब्रुवारीमध्ये झाल्याचे दिसते. यंदा, मात्र, डिसेंबरच्या मध्यावरच नीचांकी तापमानाची नोंद झाली. धुळ्यात आद्र्रतेचे प्रमाण वाढल्याने दिवसभरात ऊन, सावली, ढगाळ वातावरण असा पाठशिवणीचा खेळ सुरू असतो. त्यात बोचरे वारे वाहत असल्याने उबदार कपडय़ांना मागणी वाढली आहे. लोकरीच्या कपडय़ांची खरेदी केली जात आहे. विक्रेत्यांनी ठिकठिकाणी दुकाने थाटून स्वेटर विक्री सुरू केली आहे. दुसरीकडे भल्या सकाळी व्यायाम आणि फिरण्यासाठी बाहेर पडणाऱ्यांची मैदानावर गर्दी वाढली आहे.

द्राक्षमण्यांना तडे जाण्याची भीती

द्राक्षांसाठी हंगाम पोषक राहिल्याने द्राक्षांची चांगल्या पद्धतीने वाढ झाली. परंतु थंडीची लाट कायम राहिल्यास द्राक्षांना तडे जाण्याची भीती व्यक्त होत आहे. ज्या द्राक्ष मण्यांमध्ये पाणी उतरले, त्या बागांना हा फटका सहन करावा लागेल. इतर बागांची वाढ संथ होईल. द्राक्षमण्यांना फुगवण मिळणार नाही. याचा फटका मण्यांचे वजन कमी होण्यात होईल असे उत्पादकांकडून सांगितले जात आहे.

Story img Loader