जळगाव – चंद्रज्योतीच्या बिया खाल्ल्यामुळे १० मुलांना विषबाधा झाली. अमळनेर तालुक्यातील गांधली येथे ही घटना घडली. विषबाधा झालेल्या मुलांना अमळनेर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मुलांची प्रकृती स्थिर असली, तरी सावधानता म्हणून जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील बालरोगतज्ज्ञांचे पथक अमळनेर येथे पाठविण्यात आले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बाधितांमध्ये सहा मुली आणि चार मुलांचा समावेश आहे. सर्व मुलांचे वय १० ते १२ वर्षांपर्यंत आहे. याबाबतची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली. विषबाधा झालेल्या एका मुलाला धुळे येथे हलविण्यात आले आहे. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी मुलांच्या उपचारात कुठलीही कमतरता न ठेवण्याचे निर्देश आरोग्य विभागाला दिले आहेत.

हेही वाचा – कांदाप्रश्नी केंद्रीय राज्यमंत्री मूग गिळून, भाजपला माजी खासदाराकडून घरचा अहेर

हेही वाचा – सूरत-चेन्नई महामार्ग भूसंपादनाचा पेच; दर निश्चितीवर डॉ. भारती पवार यांच्याकडून ताशेरे

ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांनी भ्रमणध्वनीद्वारे संपर्क करून जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्याकडून माहिती जाणून घेतली. मदत व पुनर्वसनमंत्री अनिल पाटील यांनी ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकार्‍यांकडून मुलांच्या प्रकृतीबाबत माहिती घेतली. वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रांजली पाटील, डॉ. प्रकाश ताडे यांनी तातडीने उपचार केले. घटनेची माहिती मिळताच प्रांताधिकारी महादेव खेडकर यांनी तहसीलदार रुपेशकुमार सुराणा यांना ग्रामीण रुग्णालयात पाठवून मुलांच्या आरोग्यसेवेबाबत आदेश दिले. पोलीस निरीक्षक विजय शिंदे यांनीही रुग्णालयात जाऊन बालकांची चौकशी केली.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ten children poisoned by eating chandrajyoti seeds incident in amalner taluka ssb
Show comments