नाशिक : नाशिक लोकसभा मतदारसंघात जुने नाशिक येथील मतदान केंद्रावर भाजपच्या आमदार देवयानी फरांदे आणि ठाकरे गटाचे माजी आमदार वसंत गिते यांच्यात हमरीतुमरी झाल्यामुळे काही काळ वातावरण तणावपूर्ण बनले. दोन्ही बाजूंच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केल्यामुळे मतदानास आलेले मतदारही धास्तावले. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करीत कार्यकर्त्यांना पांगवले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नाशिक लोकसभेच्या निवडणुकीकडे आगामी विधानसभा निवडणुकीची पूर्वतयारी म्हणून पाहिले जात आहे. नाशिक मध्य विधानसभा मतदार संघातील परस्परांचे कट्टर प्रतिस्पर्धी असणाऱ्या भाजपच्या देवयानी फरांदे आणि ठाकरे गटाचे माजी आमदार वसंत गिते हे दुपारी दूध बाजार भागातील महात्मा फुले मंडईतील मतदान केंद्रावर समोरासमोर आले आणि वादाला तोंड फुटले. इतके लोक घेऊन मतदान केंद्रावर कसे आलात, याची विचारणा गितेंकडून करण्यात आल्यावर आमदार फरांदे संतापल्या. त्यांनी गितेंना ‘नीट बोला, तुम्ही इतके लोक घेऊन कसे आले, तुमची जहागीर आहे का, असा जाब विचारला. एकेरी उल्लेख करण्यात आला. शाब्दिक वादामुळे कार्यकर्ते बिथरले. त्यांनी घोषणाबाजी सुरू केली. ठाकरे गटाचे माजी महापौर विनायक पांडे यांनी मध्यस्ती करीत वाद मिटवण्याचा प्रयत्न केला. परंतु, दोघांचेही समर्थक काही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. आजी-माजी आमदारांतील वाद आणि कार्यकर्त्यांच्या घोषणाबाजीमुळे मतदानासाठी आलेले मतदार धास्तावले. काहींनी काढता पाय घेतला. पोलिसांनी दोन्ही बाजूच्या समर्थकांना दूर केले.

हेही वाचा…नाशिक : मतदान केंद्रांवर कर्मचाऱ्यांना अनेक गैरसोयी

या संदर्भात फरांदे आणि गिते या दोघांशीही भ्रमणध्वनीवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. परंतु, ते उपलब्ध होऊ शकले नाहीत. नाशिक लोकसभा मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाचे हेमंत गोडसे आणि ठाकरे गटाचे राजाभाऊ वाजे यांच्यात मुख्य लढत होत आहे. ही जागा राखण्यासाठी महायुतीने कंबर कसली आहे. शहरातील तीन मतदारसंघात भाजपच्या तर, देवळाली व सिन्नर मतदारसंघ राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या ताब्यात आहे. लोकसभेच्या माध्यमातून आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने सर्व विधानसभा मतदारसंघात आजी-माजी आमदारांनी तयारी चालविली आहे. यातील कट्टर विरोधकांच्या संघर्षाला आतापासून सुरूवात झाल्याचे फरांदे-गिते वादातून समोर आले आहे. मतदान केंद्राच्या परिसरात झालेल्या या वादाबाबत पोलीस काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष आहे.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tensions flare between bjp mla devyani farande and uddhav thackeray group s vasant gite at nashik polling station psg
Show comments